उरण : वार्ताहर
उरण पोलीस ठाण्यामार्फत शहर आणि परिसरात बेशिस्त वाहन चालविणार्या विशेषतः दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाईची मोहीम उरण चारफाटा येथे करण्यात आली.
वाढत्या वाहनांमुळे तालुक्यात वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदिश कुलकर्णी यांच्या अधिपत्याखाली बेकायदा वाहन चालविणार्यांविरोधात दंडात्मक कारवाईची मोहीम राबविण्यात आली. या वेळी वाहन चालविताना मोबाइलचा वापर करणे, विना हेल्मेट, वाहनचालक परवाना नसणे, विचित्र पद्धतीने वाहन चालविणे यांसह वाहनांच्या विविध कायद्यांविरोधात वाहन चालविणार्यांवर कडक मोहीम राबविण्यात येऊन 100हून अधिक वाहनांची तपासणी करून 40 ते 50 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली.
या कारवाईच्या मोहिमेत उरण पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पठाण, पोलीस उपनिरीक्षक सचिन वायकर, पोलीस हवालदार दिलीप कोंढवळे आणि पोलीस शिपाई निलेश ठाकूर या पथकाने सहभाग घेतला होता.