उरण ः उरण तालुक्यातील करंजा येथील द्रोणागिरी हायस्कूल इंग्लिश माध्यमाच्या मुख्याध्यापिका माधुरी प्रभू यांच्या पुढाकाराने व सहकार्याने झी मराठी वाहिनीवरील अभिनेते आदेश बांदेकर यांचा होम मिनिस्टर कार्यक्रम व नारळी पोर्णिमेच्या भागाचे चित्रीकरण नुकतेच करंजा येथे झाले. कासवले पाडा येथील स्नेहा तुषार नाखवा यांच्या घरी केलेले कार्यक्रम बुधवारी (दि.14)सायंकाळी 6.30 वाजता होम मिनिस्टर कार्यक्रमात दाखविण्यात येणार आहे. द्रोणागिरी शाळेजवळील नूतन प्रदीप पाटील यांच्या घरी केलेले कार्यक्रम शुक्रवारी (दि. 16) सायंकाळी 6.30 वाजता दाखविण्यात येईल.
विदेशी दारूचा साठा हस्तगत
पनवेल ः गेल्या काही महिन्यापासून तळोजा एमआयडीसीच्या बाजुला असलेल्या नागझरी गावात मोठ्या प्रमाणात विदेशी दारुचा साठा काही जण करीत असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी बातमीदारांच्या आधारे विशेष पथक तयार करून त्या ठिकाणी छापा टाकून विदेशी दारूचा बेकायदेशीर साठा जप्त केला आहे. या दारूची किंमत 3,30,350 रुपये इतकी आहे. तसेच या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
प्लास्टिक बाटली पुनःसंस्कारन यंत्र
पनवेल ः पनवेेलजवळील पिल्लई एचओसी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलोजीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्लास्टिक बाटली पुनःसंस्कारन यंत्र बसविण्यात आले असून त्याचे उद्घाटन वाईस प्रेसिटेंड रिलायन्स इंडस्ट्रीयलचे भारत मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पिल्लईचे डॉ. के. एम. वासुदेवन, पिल्लई सीईओ डॉ. प्रीतम पिल्लई आदी मान्यवर उपस्थित होते. येथे जमणार्या प्लास्टिकच्या माध्यमातून पिशव्यांची निर्मिती केली जाते. तसेच त्यातून महिला वर्गासाठी काल्फ बनविण्यात येत असल्याची माहिती संस्थेतर्फे देण्यात आले.
मोफत कृमिनाशक औषधांचे वाटप
पनवेल ः रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल, रायगड जिल्हा केमिस्ट व डिस्ट्रीबुटर्स असोसिएशन, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन महाराष्ट्र शाखा, यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल पंचायत समितीच्या सहकार्याने मोफत कृमिनाशक औषधांचे वाटप राष्ट्रीय कृमिनाशक दिनाचे औचित्य साधून पनवेल तालुक्यातील 27 ग्रामपंचायतमधील काही गावात करण्यात आले. या प्रसंगी रायगड जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष लीलाधर पाटील सचिव प्रवीण नावंधर, सचिव नितीन मणियार अन्न व औषध प्रशासनाचे माजी सहाय्यक आयुक्त साहेबराव साळुंखे, सचिव औषध निरीक्षक गादेवर, पनवेल महानगर पालिकेचे सभागृहनेते रोटरी सदस्य परेश ठाकूर, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी टेतगुरे, पनवेल पंचायत समिती सभापती प्रणाली भोईर, माजी सभापती निलेश पाटील, विक्रम कैय्या, ऋषीकेश बुवा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ही मोहीम राबविण्यात आली.
उरण महाविद्यालयामध्ये आरोग्य जनजागृती
उरण ः कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त आरोग्य जनजागृती शिबिर झाले. कोकण ज्ञानपीठ उरण महाविद्यालय व रेड रिबन क्लब विभाग, इंदिरा गांधी हॉस्पिटल, उरण यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन केले गेले. महाविद्यालयाचे प्राचार्य के. ए. शामा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. महाविद्यालयातील प्रा. व्ही. एस. इंदुलकर यांनी आरोग्याची काळजी घेणे किती महत्वाचे आहे, याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमामध्ये प्रथम रतिश पाटील यांनी क्षयरोग (टी.बी) या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. महादेव पवार यांनी एच.आय.व्ही. एडस्विषयी एक फिल्म उपस्थित विद्यार्थ्यांना दाखविली व सविस्तर मार्गदर्शन केले. मोहन जगताप यांनी साथीचे आजार, कीटकजन्य आजार, मलेरिया, डेंग्यू ताप, हत्तीरोग, चिकनगुनिया आदी आजारांवर मार्गदर्शन केले व स्मिता कोंडे यांनी उपस्थितीत 25 विद्यार्थ्यांची एचआयव्ही तपासणी तसेच मलेरिया तपासणी करण्यात आली. सूत्रसंचालन प्रा. डॉ. डी. पी. हिंगमिरे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रा. एच. के. जगताप, प्रा. डॉ. पराग कारुळकर, प्रा. रामकृष्ण ठवरे, प्रा. अरुण चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री लक्ष्मी नारायण मंदिरात कुंकूमार्जन
पनवेल : पनवेलमधील पुरातन श्री लक्ष्मी नारायण मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त शुक्रवारी कुंकूमार्जन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात उत्साहाने मोठ्या प्रमाणात महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या. पनवेलमधील 350 वर्षे पुरातन श्री लक्ष्मी नारायणाच्या जागृत मंदिरात दरवर्षी सिकेपी समाजातर्फे श्रावण महिन्यात कुंकूमार्जन सोहळा आयोजित करण्यात येतो. यंदा शुक्रवार 9 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात 30 महिला भगिनी उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. कुंकूमार्जन सोहळ्यानंतर सर्वांना महाप्रसाद करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष आशिष गुप्ते, सचिव गिरीश गडकरी, खजिनदार श्रीकृष्ण चित्रे, सहसचिव संदीप देशमुख, विश्वस्त उल्हास शृंगारपुरे, राजेश राजे, निरंजन गुप्ते उपस्थित होते. या वेळी श्री लक्ष्मी नारायणाच्या मंदिराचे जीर्णोध्दारासाठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन ट्रस्टींकडून करण्यात आले.