आठ दुकानांवर मनपाची कारवाई
पनवेल : बातमीदार
’मिशन बिगिन अगेन’अंतर्गत राज्य सरकारच्या आदेशाने पनवेलमधील दुकाने सम-विषमप्रमाणे सुरू करण्यात आली आहेत. मात्र काही दुकानचालकांकडून या नियमांचे उल्लंघन केले जात असल्यामुळे प्रभाग अधिकार्यांनी परवानगी नसताना उघडलेल्या दुकानांवर गुरुवारी कारवाई केली.
लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर जनजीवन पूर्ववत होत असून नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे बाजारात, दुकानांमध्ये गर्दी वाढू लागली आहे. पनवेल शहरात खरेदीसाठी येणारी गर्दी नेहमीप्रमाणे होऊ लागल्यामुळे शहरात वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनामध्ये चिंतेचे वातावरण आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी करू नये, सम-विषम तारखेप्रमाणे दुकाने सुरू करून गर्दी टाळावी असे आवाहन करूनही पनवेल शहरातील काही दुकान चालक दुकान बंद करण्याची तारीख असताना दुकान सुरू ठेवत होते. त्यामुळे पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ‘ड’चे प्रभाग अधिकारी सदाशिव कवठे यांनी पनवेल शहरातील आठ दुकानांवर कारवाई केली.
यामध्ये किराणा माल, कपडे आदी दुकाने आहेत. शहरात सम-विषम तारखेप्रमाणे दुकाने उघडत असतून प्रभाग अधिकार्यांना कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. साथरोग कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. या दुकानचालकांकडून वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे दंड वसूल करण्यात येणार आहे, अशी माहिती सदाशिव कवठे यांनी दिली.
कोरोनाचा संसर्ग वाढण्याचे लक्षणे दिसत असून नागरिकांना बाजारात जास्त गर्दी करू नये. दुकानांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून उपाययोजन केल्या जात असताना काही दुकानचालक सहकार्य करीत नाहीत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ नये म्हणून नागरिकांनी स्वत:ची आणि शहराची काळजी घेतली पाहिजे.
-जमीर लेंगरेकर, उपायुक्त