Breaking News

रायगडातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ, अलिबागमधील डॉक्टरांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपये

अलिबाग : प्रतिनिधी

इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) अलिबागच्या वतीने सांगली, कोल्हापूर येथे पूरग्रस्त भागात कपडे, औषधे, खाण्याच्या वस्तू, भांडी ही वस्तूरूपी मदत पाठविण्यात आली आहे, तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एक लाख रुपयांची मदत चेकद्वारे देण्यात आली आहे.

आयएमए अलिबाग शाखेतर्फे डॉक्टरांनी पूरग्रस्त भागात पाठविण्यासाठी कपडे, खाण्याच्या वस्तू, भांडी, औषधे गोळा केली आहेत, तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एक लाखांची मदतही चेकने बँकेत भरण्यात आली आहे. वस्तूरूपी गोळा केलेली मदत व्यवस्थित बॅगेत पॅक करून अलिबागमधील डॉ. अरविंद केळकर यांच्यामार्फत पूरग्रस्त भागात पोहचविण्यात येणार असल्याचे आयएमएचे अध्यक्ष राजेंद्र चांदोरकर यांनी सांगितले.

 आयएमएचे अध्यक्ष राजेंद्र चांदोरकर, सचिव संजीव शेटकार, खजिनदार डॉ. सतीश विश्वेकर, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, डॉ. चंद्रकांत वाजे, डॉ. एस. एन. तिवारी, डॉ. किरण नाबर, डॉ. अतुल तांबोळी, डॉ. प्रशांत जन्नवार, डॉ. विनायक पाटील, डॉ. समीर नाईक, डॉ. ओजस्विनी कोतेकर, डॉ. अनिता शेटकार, डॉ. राजश्री चांदोरकर, डॉ. प्रणाली पाटील, डॉ. स्वाती विश्वेकर या वेळी उपस्थित होते.

माथेरानकरांचाही पुढाकार

कर्जत : बातमीदार

नगर परिषदेतर्फे करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत माथेरानमधील नागरिक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

नगराध्यक्षा प्रेरणा सावंत आणि मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पूरग्रस्तांना यथाशक्ती मदत करण्याचे आवाहन माथेरानमधील नागरिकांना केले होते. त्याअनुषंगाने नागरिकांनी नगर परिषदेच्या कम्युनिटी सेंटर हॉल या मदत केंद्रात अवघ्या एकाच दिवसात तांदूळ, पीठ, तेल, बिस्किटे, साड्या, कपडे, मेडीसिन, साबण, पाणी बॉटल, कांदे-बटाटे अशा अनेक जीवनावश्यक वस्तू जमा केल्या. येथील गृहिणी तसेच मोलमजुरी करणार्‍या महिलांबरोबर हॉटेलमालक, सामाजिक संस्था व सर्वसामान्य नागरिकांनी सढळ हाताने सुमारे तीन ते चार टन जीवनावश्यक वस्तू जमा करून माणुसकीचे दर्शन घडविले. या जमा झालेल्या वस्तू माथेरान नगर परिषदेच्या वतीने कर्जत तहसीलदारांकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.

हे मदत साहित्य जमा करण्यासाठी नगर परिषदेचे बांधकाम सभापती प्रसाद सावंत, कर्मचारी चंद्रकांत शेट्टे, सचिन दाभेकर, लक्ष्मण कदम, निमेष मेहता यांनी विशेष परिश्रम घेतले. या वेळी नगरसेवक चंद्रकांत जाधव, शकील पटेल, नरेश काळे, चर्मकार समाजाचे अध्यक्ष सूर्यकांत कांरडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

मुस्लिम समाज आघाडीवर

कर्जत : बातमीदार

कर्जत अपडेट या सोशल मीडिया ग्रुपवरून आवाहन करण्यात आल्यानंतर तालुक्यातून पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणात मदत गोळा झाली असून, सर्व मदत कर्जत तहसील कार्यालयात जमा करण्यात आली. नेरळ आणि कळंब येथील ‘मुस्लिम जमात‘ च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत गोळा करण्यात आली.

 पूरग्रस्तांना प्रामुख्याने जीवनावश्यक वस्तू देण्याचे आवाहन ‘कर्जत अपडेट‘ या सोशल मीडिया ग्रुपकडून करण्यात आले होते. त्यानुसार ताटे, ग्लास, चमचे, वाट्या, टॉवेल, बेडशीट, चादरी, ब्लँकेट, साबण, रुमाल, माचिस, टी शर्ट, फिनेल, कोलगेट, बिस्किटे बॉक्स, सॅनिटरी पॅड, कपडे, धान्य, साड्या, पाणी आदी वस्तूंची मदत गोळा करण्यात आली. या साहित्याने सुमारे 106 बॅगा भरल्या असून, त्या सर्व तहसील कार्यालयात नेवून देण्यात आल्या. ही मदत गोळा करण्यासाठी नेरळ आणि डिकसळमधील कर्जत अपडेटच्या सक्रिय कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला होता.

नेरळ जामा मशीद ट्रस्ट आणि कळंब मुस्लिम जमात यांनी बकरी ईदनिमित्त पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन केले होते. त्याचे मुस्लिम बांधवांनी जोरदार स्वागत करीत तब्बल 82 हजार रुपयांची मदत गोळा केली. त्या पैशांतून कपडे, भांडी, मेडिकल साहित्य खरेदी करण्यात आले. त्या सर्व साहित्याने भरलेल्या बॅगा कर्जत तहसील कार्यालयात जमा करण्यात आल्या.

संत निरंकारी मंडळाकडून जेवणाचे साहित्य रवाना

खालापूर : प्रतिनिधी

संत निरंकारी मंडळाच्या खालापूर शाखेच्या वतीने सांगलीतील एका सभागृहात सुमारे एक हजार नागरिकांचे जेवण तयार करून ते पूरग्रस्तांना वितरित करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. 

मंडळाच्या खालापूर शाखेचे अभिषेक दर्गे, अनंत बैलमारे, योगेश बैलमारे, सागर गुजरे, राजेश बैलमारे, गजानन शिंदे, संतोष केदारी यांच्यासह अन्य सदस्यांच्या वतीने अभिषेक दर्गे सांगली येथे एक ट्रक पाण्याचे बॉटलसह, एक हजार किलो तांदूळ, कडधान्ये, आवश्यक असणारे नवीन कपडे, साड्या, ड्रेस, साबण व औषधे असे सामान घेऊन गेले आहेत. या कार्याबद्दल खर्‍या अर्थाने धार्मिकता जोपासली असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

समाजाला मदतीची गरज असेल तेथे सामाजिक काम करून धार्मिक कार्य करा, अशी शिकवण हरदेव बाबांनी दिल्याने खालापूर तालुक्याच्या वतीने आम्ही पूरग्रस्तांना मदत करून धार्मिक आनंद मिळविला.

-अभिषेक दर्गे, सदस्य,

संत निरंकारी मंडळ, खालापूर

Check Also

आमदार महेश बालदी यांचा विविध वाड्यांमध्ये प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा प्रचार सभा प्रमुख प्रवीण काळबागे, माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर घरत …

Leave a Reply