Breaking News

चिरनेरचा महागणपती

देवांचा अधिपती श्री गणेशाचे अनेक अवतार आहेत. त्याच अवताराचे प्रतीक म्हणून चिरनेरचा महागणपती प्रसिद्ध आहे. अनेक ठिकाणी गणेश मंदिरे आहेत. महाराष्ट्रात तर अष्टविनायक प्रसिद्ध आहेत. चिरनेरचा बाप्पा महागणपती म्हणून ओळखला जातो. दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती याप्रमाणे आज चिरनेरच्या महागणपती मंदिरात लाखो लोकांचे कर जुळले जातात. भाविक-भक्तांना महागणपतीची प्रचिती अनुभवाला येते. म्हणूनच लाखो लोक रांग लावून त्याचे दर्शन घेताना पहावयास मिळतात.

चिरनेरचे मंदिर हेमाडपंथी आहे. येथील महागणपतीची मूर्ती पूर्वाभिमूख असून, सहा फूट उंच व तीन फूट रूंद आहे. मंदिराला चारही बाजूला चार कळस आहेत व मुख्य घुमटावर कमळाची नक्षी आहे. चिरनेर हे पौराणिक, ऐतिहासिक तसेच निसर्गरम्य गाव आहे. चिरनेरच्या महागणपतीचा जन्मोत्सव गावकरी अत्यंत श्रद्धेने व मोठ्या भक्तीभावाने साजरा करतात. पाच दिवस साजर्‍या केल्या जाणार्‍या या उत्सवाला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. या काळात भाव-भक्तीचा जणू महापूर लोटतो. बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविक, भक्त, पै पाहूणे, गावातील लोकांचे नातेवाइक, इष्टमित्र तसेच रायगड, नवी मुंबई, मुंबई, ठाणे येथील भाविक मोठ्या संख्येने चिरनेरला येतात.

चिरनेर येथे सत्याग्रहींनी महागणतीचे दर्शन घेऊन सत्याग्रहाला सुरुवात केली होती. त्याच देवळाच्या सभामंडपात ब्रिटीशांनी सत्याग्रहींना डांबून ठेऊन अनन्वित मारहाण करून छळ केला. एका सत्याग्रहीवर ब्रिटीशांनी गोळी झाडली. त्यात त्याचा हात तुटला. ती गोळी सभामंडपाच्या गजाला लागली व तो गोळी लागलेला गज आजही सत्याग्रहाची साक्ष देत आहे. स्वातंत्र्यासाठी लढा देणार्‍या सामान्य शेतकरी आदिवासी व अन्य उच्चवर्णीय जातीच्या लोकांनी भाग घेऊन जोरदार लढा दिला. अनंत यातना सोसल्या. त्यांचे प्रेरणास्थान श्री महागणपतीच होता.

1930 साली झालेल्या स्वातंत्र्यलढ्यात आठ हुतात्म्यांनी बलिदान दिले. त्या हुतात्म्यांचे स्मृतिस्तंभावर नाव नाही, नाही चिरा वा नाही पणती अशी स्थिती होती. 1932 साली बांधलेला स्मृतिस्तंभ बिटिशांनी पाडून नेस्तनाबूत केला. त्याचा दगडी कळस 300 वर्षांपूर्वीच्या अशोक वृक्षाच्या पारावार धूळखात पडला होता. त्याची सल माझ्या मनात होती. श्री महागणतीच्या चरणावर हात ठेवून ज्यांनी देवालयासमोर आत्मबलिदान दिले त्यांचे स्मारक म्हणजे पूर्णाकृती पुतळे उभारणाचा मनोदय मी व्यक्त केला तसेच उपस्थितांसमोर ही योजना मांडली. त्यांनाही ती आवडली. त्यांनी त्याच ठिकाणी गणपती मंदिरात मंजुरी दिली. मग आमचे पनवेल येथील ज्येष्ठ व श्रेष्ठ शिल्पकार अरुणबुवा कारेकर यांच्यावर ही जबाबदारी सोपविली. रात्रंदिवस जीवाचे रान करून हे शिल्पपुतळे आठ महिन्यांच्या अवधित पूर्ण करून सत्याग्रहाच्या 75व्या हुतात्मा दिनी या पुतळ्यांचे अनावरण झाले.

चिरनेर गाव रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात प्रसिद्ध आहे. ते पनवेलपासून गव्हाणफाटा मार्गे 20 किमी, उरणपासून खोपटामार्गे 14 किमी, तर पेणपासून खारपाडामार्गे 21 किमी आहे. या मंदिरात येण्यासाठी एसटी बस, रिक्षा व खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. चिरनेरचा स्वयंभू असा महागणपती देवांचा अधिपती असला तरी भक्तांच्या हाकेला धावणारा, संकटाचे हरण करणारा, सर्व स्तरातील समाजाचा सुखकर्ता, दुःखहर्ता म्हणून प्रसिद्ध आहे. माघी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने त्याला माझे वंदन. बा गणेशा! अशीच सर्वांवर कृष्पादृष्टी ठेव!

-धनंजय गोंधळी, ज्येष्ठ पत्रकार, चिरनेर

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply