Breaking News

खंबीर आणि सजग सरकार

भारताच्या भविष्यातील परराष्ट्र धोरणाची दिशा यातून स्पष्ट व्हावी. देशासमोरील मोठ्या आव्हानांचा उल्लेख करताना त्यांनी पाणीटंचाईकडे सर्वाधिक लक्ष वेधले. विविध मार्गांनी पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्याची गरज असल्याचे सांगून आपले सरकार या आव्हानाचा सामना प्रामाणिकपणे करते आहे याची खात्री त्यांनी देशवासियांना दिली.

जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 मागे घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर स्वातंत्र्यदिनी लालकिल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमके काय बोलतात याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले होते. तब्बल 92 मिनिटांच्या आपल्या भाषणात मोदीजींनी आज अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेच, परंतु देशाच्या तिन्ही दलांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी सरकार आता ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ नेमणार असल्याची महत्त्वाची घोषणा मोदीजींनी यावेळी केली. 1999च्या कारगिल युद्धानंतर या पदाची शिफारस सर्वप्रथम केली गेली होती, हे लक्षात घेतले असता मोदी सरकार सैन्य दले आणि देशाची सुरक्षितता याविषयी किती सजगपणाने निर्णय घेते आहे याचेच दर्शन घडते. कलम 370 रद्द करण्यासारखा निर्णय धडाडीने घेणार्‍या सरकारला सुरक्षा दलांच्या संदर्भात आत्यंतिक खंबीर निर्णय घेण्याची गरज आहेच आणि हे सरकार त्यासंदर्भात अत्यंत जबाबदारीने व पुढाकार घेऊन निर्णय घेईल याचाच प्रत्यय या घोषणेने येतो. आपली सैन्य दले हा आपला अभिमान आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले. मोदींचे आजचे भाषण हे सलग सहाव्यांदा स्वातंत्र्यदिनी त्यांनी लालकिल्ल्यावरून केलेले भाषण होते. यात राजकीय अभ्यासकांकडून विशेष दखल घेतली गेलेली बाब म्हणजे बुधवारी पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त बोलताना त्या देशाचे पंतप्रधान इमरान खान यांनी कलम 370च्या निमित्ताने आपल्या अवघ्या भाषणाचा रोख भारतावर टीका करण्याचाच ठेवला. तर त्याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र आपल्या प्रदीर्घ भाषणात पाकिस्तानचा नामोल्लेख सुद्धा केला नाही. ते बांगला देश, श्रीलंका आणि अफगाणिस्तानविषयी बोलले. परंतु पाकिस्तानला मात्र त्यांनी आपल्या भाषणात पूर्णत: वगळले. जलजीवन अभियानाकरिता 3.35 लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याचे सांगत या अभियानाअंतर्गत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातच ज्या गावखेड्यांनी कधी नव्हे ते वीजपुरवठा नियमित होताना पाहिला आहे, ज्यांनी शौचालयांकरिता सरकारकडून निधी उपलब्ध होतो हे अनुभवले आहे, अशा खेडोपाडीच्या जनतेला मोदींचे हे आश्वासक बोल निश्चितच दिलासा देतील. गेल्या काही वर्षांत जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आता निव्वळ पक्के रस्ते, काही तासांपुरती येणारी वीज, रेल्वेस्थानके आदींनी लोकांचे समाधान होत नाही. आता सगळ्यांनाच चौपदरी रस्ते, चोवीस तास वीजपुरवठा आणि आपल्या परिसरात विमानतळ हवा आहे. दहशतवादाने देशाला आजवर वाळवीसारखे पोखरले, परंतु आपले सरकार मात्र दहशतवादाचा कणखरपणाने मुकाबला करणार आहे याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. आपल्या सरकारचा दुसरा कार्यकाळ सुरू होऊन अवघे दहा आठवडे झाले आहेत, परंतु तरीही आपण या प्रश्नाला निर्णायक वळण देणारे निर्णय घेतले आहेत, असे प्रतिपादनही मोदीजींनी यावेळी केले, जे रास्तच आहे. आधीच्या सरकारांकडे हिंमतीचा अभाव होता त्यामुळे त्यांनी निव्वळ निष्क्रियतेचे धोरण राबवले हे मोदीजींचे उद्गार निश्चितच अवघ्या देशाला पटले असतील.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply