Breaking News

‘दिबां’साठी कितीही गुन्हे झाले तरी बेहत्तर!

पनवेल : वार्ताहर

नवी मुंबई विमानतळाला माजी खासदार लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी करण्यात येणार्‍या आंदोलनाच्या नियोजनाबाबत बैठक आयोजित केल्याबद्दल मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र महादेव पाटील यांच्यावर एन आर आय पोलीस ठाण्याच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेळी आमचे उद्धारकर्ते असणार्‍या दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यासाठी असे अनेक गुन्हे अंगावर घ्यायला लागले तरी बेहत्तर, असे राजेंद्र पाटील यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. 24 जूनच्या सिडको घेराव आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी राजेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वहाळ, बामणडोंगरी, मोरावे, जावळे, गणेशपुरी आणि उलवे नोड येथील नागरिकांसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाचे कारण पुढे करत स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये राजेंद्र पाटील यांच्यावर भां. द. वी. अनुसार कलम 188 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना राजेंद्र पाटील म्हणाले की दि. बा. पाटील यांच्यासाठी होणार्‍या आंदोलनात पहिला गुन्हा अंगावर घेण्याचा सन्मान मला प्राप्त झाला ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. पोलिसांनी सद्विवेक बुद्धीने काम करावे की, कोणाच्या दबावाखाली काम करावे हा त्यांचा प्रश्न आहे. माझ्यासाठी मात्र प्रकल्पग्रस्तांचे कैवारी आणि भूमिपुत्रांचे दैवत असणार्‍या दि. बा. पाटील साहेबांच्यासाठी अंगावर गुन्हा घेणे ही अभिमानाची बाब वाटते.

राजेंद्र पाटील आंदोलनावर ठाम

राजेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचे स्पष्टीकरण देण्याबाबत त्यांना पोलीस ठाण्यात पाचारण करण्यासाठी 24 जून रोजी सकाळी 10 वाजताचा मुहूर्त पोलिसांनी शोधला आहे. याच दिवशी याच वेळी प्रकल्पग्रस्त बांधव आंदोलन करणार असल्यामुळे राजेंद्र पाटील यांनी आंदोलनात जाऊ नये यासाठी पोलिसांनी तिरकी चाल खेळल्याची चर्चा सर्वत्र रंगत आहे. असे असले तरी पाटील आंदोलनावर ठाम आहेत.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply