टाळेबंदीत बंद असलेली लोकल पुन्हा प्रवाशांच्या सेवेत
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
टाळेबंदीत बंद असलेली नेरुळ ते खारकोपर लोकल सेवा आठ महिन्यांनी पुन्हा प्रवाशांच्या सेवेत येत आहे. अत्यावश्यक सेवा कर्मचारी आणि महिलांसाठी 20 नोव्हेंबरपासून या मार्गावर आठ लोकल फेर्या होतील, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. यात नेरुळ ते खारकोपर आणि बेलापूर ते खारकोपर मार्गावर प्रत्येकी चार फेर्या होतील. सध्या मध्य रेल्वे सीएसएमटी ते कल्याण, कर्जत, कसारा, सीएसएमटी ते पनवेल, गोरेगाव आणि ठाणे ते वाशी, पनवेल या ट्रान्स हार्बरवर फेर्या वाढणार आहेत.
मार्चपासून टाळेबंदीमुळे रेल्वेसेवा ठप्प होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने रेल्वे सुरू करण्यात आली. हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावर रेल्वे सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र नेरुळ-खारकोपर रेल्वे सेवा बंद होती. त्यामुळे या मार्गावरून मुंबई, नवी मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी येणार्या कर्मचार्यांची मोठी गैरसोय होत होती. त्यात या मार्गावर बससेवाही सुरू नसल्याने मिळेल त्या वाहनाने ते नेरुळपर्यंत येत होते. त्यानंतर पुढील प्रवास केला जात होता. याचा आर्थिक फटका तर सहन करावा लागत होताच मात्र वेळही जात होता. त्यामुळे प्रवाशांकडून या मार्गावर रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी होत होती.
मध्यरेल्वे मुख्य मार्ग, हार्बर मार्ग आणि ट्रान्सहार्बर मार्गावर दररोज 1,572 उपनगरी फेर्या चालवित आहे. चौथ्या मार्गिकेवर म्हणजेच नेरुळ-बेलापूर-खारकोपर मार्गावर आठ उपनगरी फेर्या सुरू होत आहेत. त्यामुळे शुक्रवारपासून एकूण मध्य रेल्वेच्या एकूण 1580 फेर्या होणार आहेत.
महाराष्ट्र शासनाने आणि रेल्वे मंत्रालयाने करोनाकाळात अत्यावश्यक सेवेसह काही घटकांना रेल्वे प्रवासाची परवानगी दिली आहे. त्यांनाच या सेवेचाही लाभ घेता येईल. इतर घटकांनी रेल्वे स्थानकावर गर्दी करू नये.
-अनिल जैन, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे