पनवेल : रामप्रहर वृत्त
सिडकोचे अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल भाजप यांनी केलेल्या आवाहनानुसार कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पनवेल तालुक्यातील रहिवाशांनी जीवनाश्यक वस्तूंच्या रूपाने मदतीचा हात दिला. मदतीचा ट्रक पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झेंडा दाखवून पनवेल येथून रवाना झाला.
अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रात विशेषकरून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीनंतर आता जनजीवन हळुहळू पूर्वपदावर येत आहे. पूरग्रस्तांसाठी सरकार प्रभावीपणे काम करीत असताना, समाजाच्या सर्व स्तरांतून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. अशाच प्रकारे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल भाजप यांनी मदतीचे आवाहन केले होते. त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जमा झालेल्या मदतीचा ट्रक रवाना करतेवेळी आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, विधानसभा विस्तारक अविनाश कोळी, उद्योजक हरिश्चंद्र पाटील, नगरसेवक मनोहर म्हात्रे, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, प्राचार्य नंदकुमार जाधव आदी उपस्थित होते.