Breaking News

एक पाऊल परमार्थाकडून पर्यावरणाकडे!

पनवेलमध्ये लाल मातीच्या गणेशमूर्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त

पर्यावरणपूरक उत्सव साजरे व्हावेत, तसेच सणाचे पावित्र्य जपले गेले पाहिजे असे सर्वांनाच वाटते, पण फार कमी लोक हे प्रत्यक्ष कृतीत उतरवतात. यंदाच्या गणेशोत्सवात निसर्गरक्षणाला हातभार लावण्याची संधी पनवेलमधील तीन तरुणांनी उपलब्ध करून दिली आहे. त्यांनी लाल मातीच्या गणेशमूर्ती वाजवी दरात विक्रीसाठी आणल्या आहेत. 

महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव अर्थात गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या गणरायाची घरोघरी, तसेच सार्वजनिक स्वरूपात प्रतिष्ठापना केली जाते. बरेच जण पीओपीची गणेशमूर्ती आणून तिची पूजा-अर्चा करतात आणि नंतर पाण्यात विसर्जन करतात, पण तो बाप्पा खरंच विसर्जित होतो का? तर याचे उत्तर नाही असेच आहे. विसर्जन केलेली बाप्पाची मूर्ती तलाव,

नदी, तसेच समुद्राच्या तळाशी जाऊन बसते आणि अनेक दिवसांनंतर ती काही अंशी पाण्यात विरघळते किंवा भरतीसोबत काठावर येते. मुख्य म्हणजे पीओपीमधील घातक रसायने पाण्यात विरघळतात आणि पाण्यातील जीवसृष्टीला हानी पोहोचवतात. यातूनच लाल मातीच्या गणपतीचा विचार पुढे आला, अशी माहिती पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विक्रेते अमोघ कुरघोडे, अक्षय गायकर आणि हेमंत वैद्य यांनी दिली. ते पनवेलमधील निसर्ग मित्र संस्थेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत.

पर्यावरणस्नेही लाल मातीच्या गणेशमूर्ती पनवेल शहरातील चिंतामणी सभागृहासमोर, तालुका पोलीस ठाण्याच्या मागे योगेश्वर कृपा इमारतीत गाळा क्रमांक 7मध्ये उपलब्ध आहेत. येथे अवश्य भेट द्यावी. मूर्ती बुकिंग, तसेच अधिक माहितीसाठी 9967585325 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मूर्तीविक्रेत्या तरुणांनी केले आहे.

प्रदूषणाचा भस्मासूर नष्ट करू या!

सुबक, सुंदर, नैसर्गिक रंग असलेल्या, पाण्यात सहज विरघळणार्‍या अशी अनेक वैशिष्ट्य असणार्‍या लाल मातीच्या गणेशमूर्ती अमोघ कुरघोडे, अक्षय गायकर व हेमंत वैद्य यांनी पनवेलमध्ये पहिल्यांदाच विक्रीसाठी आणल्या आहेत. प्रदूषणाचा भस्मासूर नष्ट करायचा असेल, तर प्रत्येकाने या पर्यावरणपूरक मूर्तीचा आग्रह धरला पाहिजे, असे या तरुणांचे म्हणणे आहे.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply