जयदीप गायकवाडने जिंकली आव्हानाची कुस्ती
अलिबाग : प्रतिनिधी
मांडवा येथील समुद्रकिनारी वाळूत आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील वाडगाव येथील जय हनुमान आखाड्याने सर्वाधिक 30 गुण मिळवून सांघिक विजतेपद मिळवले. आवसचा काळभैरव आखाडा 27 गुणांची कमाई करून उपविजेता ठरला. पुण्याच्या जयदीप गायकवाड याने आव्हानाची कुस्ती जिंकली.
टाकादेवी स्पोर्ट्स क्लब व ग्रामस्थ मांडवा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्रकिनार्यावर राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाते. सुमारे 125 वर्षांहून अधिक काळापासून या स्पर्धा आयोजित केल्या जातात. टाकादेवी स्पोर्ट्स क्लबने ही परंपरा अजूनही जपली आहे. यंदा राज्यात पूरपरिस्थिती असल्यामुळे स्पर्धेत कमी मल्ल येतील असे आयोजकांना वाटत होते, परंतु यंदाही स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. 300पेक्षा जास्त कुस्त्या या वर्षी खेळल्या गेल्या.
कल्याणच्या कोन येथील कला निकेतन व यजमान टाकादेवी स्पोर्ट्स क्लब मांडवा यांना समान म्हणजेच प्रत्येकी 23 गुण मिळाले होते, परंतु यजमान मांडवा आखाड्याने तृतीय क्रमांकाचे बक्षीस कोन आखाड्यास दिले.
आव्हानाची कुस्ती या स्पर्धेचे आकर्षण असते. ही कुस्ती पुण्याचा जयदीप गायकवाड व कोल्हापूरचा सचिन चव्हाण यांच्यात झाली. जयदीपने सचिनला चीतपट करून आव्हानाची कुस्ती जिंकली. भोरचा भूषण शिवतारे विरुद्ध कोल्हापूरचा नाथा चौगुले, फलटणचा रवी काटे विरुद्ध सातार्याचा गणेश तांबे या कुस्त्याही रंगतदार झाल्या, तर कल्याणचा तुषार सागर विरुद्ध सदाशिवनगरचा कालिदास रूपनवर, मांडव्याचा अंकुर घरत विरुद्ध पुण्याचा सिद्धीकेश शिवतारे या कुस्त्यादेखील चुरशीच्या झाल्या.
पंच म्हणून अंकुश धाके, बाळकनाथ माने, कुलदीप पाटील, अंकुर घरत, सौरभ पाटील, जितेंद्र माने यांनी काम पाहिले. गजानन पाटील व अजितकुमार कदम यांनी समालोचन केले. टाकादेवी स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष केशव पाटील, उपाध्यक्ष अशोक घरत, गजानन पाटील, पंढरीनाथ माने, सुनील म्हात्रे, तसेच मांडवा ग्रामस्थांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.