Breaking News

कर्जतच्या उपनगराध्यक्ष पदाची आज निवडणूक, स्वीकृत सदस्यांबद्दल उत्सुकता

कर्जत : बातमीदार

कर्जत नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक बुधवारी (दि.27) होणार आहे. स्वीकृत सदस्य निवड झाल्यानंतर उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार असून सत्ताधारी युती आणि राष्ट्रवादी आघाडी यांचा प्रत्येकी एक सदस्य स्वीकृत म्हणून निवडला जाणार आहे. दरम्यान, कोण स्वीकृत होणार याबद्दल कर्जत शहरात उत्सुकता निर्माण झाली आहे. कर्जत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 27 जानेवारीला  झाल्यानंतर शिवसेना-भाजप-आरपीआय महायुती सत्ताधारी झाली. त्यानंतर 18 फेब्रुवारीला थेट नगराध्यक्ष पदी निवडून आलेल्या शिवसेनेच्या सुवर्णा जोशी यांनी पदभार स्वीकारला.त्यानंतर उपनगराध्यक्ष पदी कोण बसणार आणि दोन स्वीकृत सदस्य कोण होणार? याची उत्सुकता निर्माण झाली. कर्जतच्या उपविभागीय अधिकारी वैशाली परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी स्वीकृत सदस्य निवड आणि उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. दुपारी 12 पासून 2 वाजेपर्यंत पीठासीन अधिकारी परदेशी यांच्याकडे उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे. त्यानंतर उपनगराध्यक्ष पदाची निवड करण्यासाठी बैठक होणार आहे. कर्जतचे उपनगराध्यक्ष पदावर कोण विराजमान होणार? याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र नगर परिषदेत  शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे बहुमत असल्याने प्रथम उपनगराध्यक्ष शिवसेनेचा होणार की भाजपचा होणार? याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र त्यापेक्षा स्वीकृत सदस्य कोण होणार? याची उत्सुकता कर्जतकरांना लागून राहिली आहे.

युतीकडून शिवसेनेचा की भाजपचा कार्यकर्ता स्वीकृत सदस्य बनणार याबद्दल जास्त चर्चा सुरू आहे. शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इच्छुक असल्याने पक्ष नेतृत्व स्वीकृत सदस्य पदी कोणाला संधी देणार? याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे. सत्ताधारी आणि विरोधी गट यात केवळ दोन सदस्यांचा फरक आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आजही पराभूत मनोवृत्तीत दिसून येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून कोण स्वीकृत होणार? याबद्दल सत्ताधारी गटाएवढी चुरस दिसून येत नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन आमदार सुरेश लाड कदाचित आपल्या सोबत येणार्‍या मित्र पक्षाला स्वीकृत पदाची संधी देतील,  अशी अटकळ आहे. कर्जत नगर परिषदेत शेकाप आणि काँग्रेसला सामावून न घेतल्याने आघाडीच्या कार्यकर्त्यांत निर्माण झालेली दरी कमी करण्यासाठी आमदार लाड हे मित्रांना संधी देण्याची अधिक शक्यता आहे.

Check Also

महायुतीचे उमेदवार बारणेंच्या विजयाचा निर्धार

पनवेल प्रभाग क्रमांक 20मध्ये प्रचाराचा शुभारंभ; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त …

Leave a Reply