राजे शिवराय प्रतिष्ठानचा कौतुकास्पद उपक्रम
पनवेल ः रामप्रहर वृत्त
नवीन पनवेल येथील राजे शिवराय प्रतिष्ठान आयोजित ‘राष्ट्र रक्षाबंधन’ उपक्रम या वर्षीही राबविण्यात आला. पनवेल, नवीन पनवेल आणि कळंबोली येथील शाळांमधील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला, तसेच सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी प्रतिष्ठाने मदत गोळा केली व प्रतिष्ठानचे कार्यकर्ते ही मदत घेऊन कोल्हापूरला पोहोचले आहेत.
राष्ट्र प्रथम या संकल्पनेत राष्ट्रासाठी जे हात सतत कार्यरत असतात त्यांच्या हाती राखी बांधावी, असा विचार घेऊन प्रतिष्ठानने हा उपक्रम चार शाळांमध्ये पोहोचविला. सीमेवरील सैनिक, अग्निशमन दल, स्वच्छता दूत, एसटी कर्मचारी आणि 24 तास झटणारे पोलीस कर्मचारी यांच्या कार्याविषयी प्रतिष्ठानने एक माहितीपट बनवून तो प्रत्येक शाळेमध्ये दाखविला. या माहितीपटाद्वारे मुलांमध्ये राष्ट्रासाठी झटणार्या प्रत्येकासाठी अभिमान जागृत करून त्यांच्याविषयी सकरात्मक भावना निर्माण करण्यात आली. यातूनच विद्यार्थ्यांनी या सर्वांसाठी पत्र लिहून भावना व्यक्त केल्या.
विद्यार्थिनींनी झटणार्या सर्वांसाठी राख्या पाठविल्या, प्रतिष्ठानने त्या त्यांच्यापर्यंत पोहोचविल्या.