म्हसळा : प्रतिनिधी
श्रीवर्धन मतदारसंघातील म्हसळा येथील काँग्रेसजनांचा निर्धार मेळावा वादळी ठरला. या वेळी बहुतांश नेत्यांनी जिल्हा धोरणावर कडाडून टीका करीत श्रीवर्धन मतदारसंघ मूळचा काँग्रेसचा असून तो काँग्रेसला सोडावा, असा आग्रह धरला.
या मेळाव्यात काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार, म्हसळा तालुका अध्यक्ष डॉ. मुईज शेख, अल्पसंख्याक अध्यक्ष दानिश लांबे, बशीर भुरे, माणगाव तालुका अध्यक्ष विलास सुर्वे, तळा तालुका अध्यक्ष खेळू वाजे, रोहा तालुका अध्यक्ष निजाम सैयद, समीर सकपाळ या सर्वांनी जिल्ह्यात काहीही होवो, पण श्रीवर्धन विधानसभा काँग्रेस लढणारच, असे स्पष्ट केले. त्यास उपस्थित कार्यकर्त्यांनी हात उंचावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नेतेमंडळी लोकसभा-विधानसभा निवडणुका आल्या की सुरुवातीला चर्चेचे
गुर्हाळ लावतात. नंतर बैठकांचा घाट घालतात व सरतेशेवटी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. आता आघाडी धर्म पाळून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम करा, असा आदेश देतात. राष्ट्रवादीची हीच मंडळी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायतीच्या निवडणुका आल्या की काँग्रेसचे अस्तित्व काय आहे, कार्यकर्ते किती, असे प्रश्न विचारून काँग्रेसला सहज संपवत आहेत. अशा वेळी दुसर्या बाजूने जिल्हा पातळीवरील काँग्रेसची नेतेमंडळी आम्हाला पोरके करतात. याचेही उत्तर या नेत्यांना आता द्यावे लागेल, असा इशारा मेळाव्यातून देण्यात आला. काँग्रेसच्या निवडणूक व कार्यकर्ता प्रशिक्षक नंदा म्हात्रे यांनी मनोगत व्यक्त केले, मात्र जिल्हा नेते अगर धोरणावर वक्त्यांनी केलेल्या टीकेला उत्तर देणे त्यांनी सोयीस्करपणे टाळले. (संतप्त प्रतिक्रिया पान 2 वर..)