महापालिका करणार 789 घरांची निर्मिती
खारघर ः वार्ताहर
केंद्र शासनाने सर्वांसाठी घरे या संकल्पनेच्या आधारे पनवेल महापालिकेने सकारात्मक कार्यवाही सुरू केली आहे. पालिका क्षेत्रात तीन प्रकल्पांना केंद्र आणि राज्य शासनाची मंजुरी मिळाली असून पहिल्या टप्प्यात वाल्मिकी नगर, लक्ष्मी वसाहत, महाकाळी नगर या झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन केले जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे 789 घरांची निर्मिती केली जाणार आहे.
या प्रकल्पांकरिता पालिकेने मंगळवारी (दि. 26) सुमारे 120.36 कोटींची निविदा जाहीर केली. या प्रकल्पातील 789 घरांमध्ये झोपडपट्टीवासियांसह 174 अत्यल्प व 150 अल्प उत्पन्न गटातील गरजूंनाही घरे दिली जाणार आहेत. 2022 ते 2025पर्यंत ही घरे पूर्ण करण्याचा कार्यकाळ दिला आहे. सध्याच्या वाल्मिकी नगर, महाकाली नगर येथील भूखंड व पनवेल शहरातील टपाल नाका येथील पालिकेच्या मोकळ्या भूखंडावर हे प्रधानमंत्री आवाज योजनेअंतर्गत घरांची निर्मिती केली जाणार आहे. 30 स्क्वे. मी. (एडब्ल्यूएस), 45 स्क्वे. मी. (एलआयजी )स्वरूपाची ही घरे असणार आहेत. पनवेल महानगरनगरपालिकेच्या आत्तापर्यंत तीन प्रकल्पाना मंजुरी मिळाली आहे.
दुसर्या टप्प्यात कच्छी मोहल्ला, पटेल मोहल्ला आणि तिसर्या टप्प्यात अशोकबाग, तक्का वसाहत आणि इंदिरानगर या झोपडपट्टीमधील रहिवाशांचे पुनर्वसन केले जाणार आहे. या तीन प्रकल्पात एकूण जवळपास 3900 घरांची निर्मिती केली जाणार असून यामध्ये 2,062 झोपडपट्टी वासियांना घरे मिळणार आहेत.