वर्धापन दिनी ‘राफेल’ ठरले आकर्षण
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय हवाई दलाचा 88वा वर्धापन दिन गुरुवारी (दि. 8) मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त हिंडन हवाईतळावरून आकाशात झेपावलेल्या विमानांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवली. या वेळी राफेल लढाऊ विमाने मुख्य आकर्षण ठरली. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी वायुसेना स्थापना दिनानिमित्त ट्विट करीत शुभेच्छा दिल्या.
या वेळी एकूण 56 विमानांनी सहभाग घेतला. त्यात राफेल, सुखोई, मिग-29, मिरज 2000, जग्वार आणि तेजस यांचा समावेश होता. स्टेटिन डिस्प्लेमध्ये, अपाचे अटॅक हेलिकॉप्टर, आकाश क्षेपणास्त्र प्रणाली, टोही विमान आणि स्वदेशी रडार प्रणाली, रोहिणी देखील हिंडन एअरबेसवर पाहायला मिळाली.
या कार्यक्रमात हवाई दलाचे एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदोरिया यांनीही प्रथमच या दलाचे प्रमुख म्हणून परेडची सलामी घेतली. त्यांनी बालाकोट हवाई हल्ल्याचा उल्लेख करताना दहशतवादी हल्ल्यांबाबत सरकारच्या पद्धतीत मोठा बदल झाला असल्याचे सांगितले.