Breaking News

अरे देवा, जलसृष्टीला धोका

गेल्या 20 वर्षांत जगभरातच पाणीसाठ्यांमध्ये वाहून आलेल्या औषधी द्रव्यांचे प्रमाण वाढले आहे. सिप्रोफ्लॉक्सासिनसारख्या प्रतिजैविकांचा अंश तर परिस्थितीकीला (इकॉलॉजी अर्थात पर्यावरणातील जैविक परस्परसंबंध) बाधा आणण्याइतपत वाढल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. याबाबत नेदरलॅण्डस्मधील रॅडबाउड विद्यापीठातील पर्यावरणतज्ज्ञांनी संशोधन केले आहे. जागतिक पातळीवर दोन विशिष्ट प्रकारच्या औषधांच्या अंशांमुळे ताज्या पाण्याचे स्रोत कसे धोक्यात आले आहेत, हे तपासून पाहणारे हे पहिलेच संशोधन आहे. अपस्मार किंवा फेफरे येण्याच्या (इपिलेप्सी) आजारावरील उपचारांत वापरले जाणारे कार्बामॅझेपाईन आणि प्रतिजैविक म्हणून वापरले जाणारे सिप्रोफ्लॉक्सासिन ही ती दोन औषधे आहेत. या औषधांचा 1995 मध्ये पर्यावरणाला जितका धोका होता, त्याच्यापेक्षा 10 ते 20 पट अधिक धोका 2015 मध्ये निर्माण झाल्याचे या अभ्यासात दिसून आले. हा अभ्यास ‘एन्व्हॉयर्न्मेंटल रिसर्च लेटर्स’ या पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. त्याचे प्रमुख लेखक रिक ओल्डनकॅम्प यांनी सांगितले की, जगभरातील पर्यावरणाला औषधी द्रव्यांचा असलेला धोका अचूकपणे जाणून घेणे हे याबाबत उपलब्ध असलेल्या माहितीवर अवलंबून आहे आणि नेमक्या यालाच मर्यादा आहेत. पर्यावरणात औषधी द्रव्यांचे नेमके किती प्रमाण आहे. हे निश्चित करण्यासाठी ‘ई-पीआयई’सारखी प्रारूपे आहेत. त्यातून तपशीलवार अंदाज मिळत असले, तरी ही प्रारूपे अनेकदा केवळ मोठ्या प्रमाणावर माहिती उपलब्ध असलेल्या ठिकाणांसाठीच (जसे की युरोपमधील नद्या) उपयुक्त ठरतात, असे ओल्डनकॅम्प यांनी स्पष्ट केले. अशाच प्रारूपावर आधारित असलेले नवे प्रारूप शास्त्रज्ञांनी तयार केले आहे. त्यातून विशिष्ट परिस्थितीकीबाबतचे जागतिक भाकीत वर्तवणे शक्य झाले आहे. जलस्त्रोतांमध्ये सिप्रोफ्लॉक्सासिनचे प्रमाण वाढल्याने त्यातील अन्नसाखळीसाठी उपयुक्त जीवाणूंचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सांडपाणी प्रक्रियेत उपयुक्त ठरणार्‍या जीवाणूंवरही याचा विपरीत परिणाम होत आहे. याशिवाय रोगजंतूंमध्ये प्रतिजैविकांसाठी प्रतिरोध तयार होत आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply