पनवेल ः नवीन पनवेल येथील ब्राह्मणसभा या संस्थेच्या वतीने सांगली येथील पूरग्रस्तांना रोख व वस्तूरूपाने सहाय्य करण्यात आले. सांगली येथील हरिपूररोड नदीलगतच्या वस्तीमधे पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना सभेच्या सदस्यांनी सहाय्य केले. ब्राह्मण सभेच्या सदस्यांंनी स्वयंस्फूर्तीने जीवनावश्यक वस्तू व रोख रक्कम जमा करण्यास सुरुवात केली. वितरणाचा कार्यक्रम सांगली येथील दांडेकर हॉलमधे संपन्न झाला. यावेळी ब्राह्मण सभा उपाध्यक्ष शंकर आपटे, मिलिंद धडफळे, चंद्रकांत ताम्हनकर व दिगंबर करंदीकर आदी प्रतिनिधी उपस्थित होते.
मराठा सेवा संघाचा वर्धापनदिन
पनवेल ः मराठा सेवा संघ जिजाऊ-शिवरायांच्या विचारात वारसा घेेऊन कार्यरत आहे. या कार्याची जागतिक स्तरावर दखल घेतली गेली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा सेवा संघाचा 29वा वर्धापन दिन सोहळा रविवार दि. 1 सप्टेंबर 2019 रोजी दुपारी 2 ते सायं. 6 या वेळी षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृह, सायन, मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या वर्धापन दिन कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विशेष अतिथी खा. छत्रपती उदयनराजे भोसले, खा. संभाजीराजे छत्रपती, महाराष्ट्र सेवा संघ महाराष्ट्राचे अध्यक्ष विजय घोगरे, स्वागताध्यक्ष नवनाथ घाडगे आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याची माहिती रायगड जिल्हाध्यक्ष प्रकाश चांदिवडे यांनी दिली.
नांदगावच्या पुलाला सुरक्षेसाठी रेलिंग
पनवेल ः सुरक्षेचे कठडे नसलेल्या नांदगावाजवळील गाढी नदीवरील पुलाला रेलिंग लावण्याचे काम सिडकोडून सुरू करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या पुलावर नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन परवानगीची कोणतीही वाट न पाहता सिडकोकडून स्वखर्चाने कामाची सुरुवात करण्यात आली. मुंबई-पुणे महामार्गावर ओएनजीसी कंपनीजवळ असलेल्या कोकण रेल्वेच्या पुलाखाली पाणी साठत असल्यामुळे महामार्गावरून पळस्पेला जाणार्या वाहनचालकांनी पर्यायी मार्ग म्हणून नांदगाव पुलाची वाट निवडली. पुलाखाली पाणी साठून वारंवार प्रचंड वाहतूककोंडी होण्याच्या घटना यंदाच्या पावसाळ्यात नेहमी घडल्यामुळे नांदगावचा हा नदीवरील कमी उंचीचा पूल वर्दळीमुळे खराब झाला.
श्री स्वामी समर्थ केंद्रात मंंगळागौर
उरण ः उरण शहरातील आनंद नगर येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास केंद्र येथे गुरुमाउली यांच्या आशीर्वादाने नुकताच श्रावण महिन्यातील मंगळागौर व श्री दुर्गा सप्तशती पाठ घेण्यात आला. या कार्यक्रमात महिलांनी मंगळागौरीची गाणी, फुगड्या, बसफुगड्या, खेळ आदी खेळ घेऊन मोठ्या उत्सवात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. सामूदायिक पठणे, खिरापत करून मंगळागौर देवीचा प्रसाद सर्वांना वाटण्यात आला. महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
खोपटे येथे कृष्ण जन्मोत्सव
उरण ः उरण तालुक्यातील खोपटे येथील दगड्या पिठ्याच्या पाड्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनंत धनाजी ठाकूर यांच्या निवासस्थानी सालाबादप्रमाणे कृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पडण्यात आला. या कार्यक्रमाची परंपरा जपण्याचे काम पुढची पिढी जोपासत आहे. यंदाचे येथील कृष्ण जन्मोत्सवाचे 108वे वर्ष आहे. यामध्ये कृष्णाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा, पूजा अर्चा, टाळ मृदंगाच्या गजरात भजनावलीसह सांस्कृतिक कार्यक्रमाची झलक दाखविण्यात आली. त्याचप्रमाणे श्री जन्मोत्सवात कृष्णाच्या पाळण्याचे ग्रामस्थांच्या हस्ते सादरीकरण व सर्व ग्रामस्थांच्या एकत्रित दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात पहिल्या दिवशी रात्री तांदळाद्वारे घरामधील जमिनीवर श्री कृष्ण मूर्ती साकारली. रात्री 12 वाजता ग्रामस्थांच्या उपस्थित श्रीकृष्णाची महाआरती करण्यात येऊन सामूहिकरित्या महाप्रसाद देण्यात आला. या कार्यक्रमाला भाविकांची मोठी उपस्थिती होती.