लष्कर, नौदल, हवाई दलही सज्ज
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान पिसाळला असून, सीमेवर दोन्ही बाजूकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू झाला आहे. त्यामुळे दोन्ही देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हद्दीत हल्ला करणारे पाकचे लढाऊ विमान पाडण्यात भारतीय सैन्याला यश आले आहे. दरम्यान, निर्माण झालेल्या संभाव्य युद्धजन्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, गुप्तचर यंत्रणा यांची महत्त्वपूर्ण बैठक घेत पुढील रणनीती निश्चित केली आहे.
एअर फोर्स अलर्ट, रणगाडेही सज्ज
इंडियन एअर फोर्सने पाकिस्तानातील बालाकोट सेक्टरमध्ये केलेला हवाई हल्ला, त्यानंतर पाकिस्तानी विमानांनी भारताच्या हद्दीत केलेली घुसखोरी या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंडियन एअरफोर्स हाय अलर्टवर आहे. पाकिस्तानने कुठलीही आगळीक केली तर त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी एअर फोर्सची फायटर विमाने अवघ्या दोन मिनिटांत आकाशात झेप घेतील. असे हवाई दलातील सूत्रांनी सांगितले.
पाकिस्तानी लष्कराची कुठलीही नापाक हरकत उधळून लावण्यासाठी भारतीय लष्करानेही चोख बंदोबस्त ठेवला आहे. नौदलही कुठलीही मोहीम पार पाडण्यासाठी सज्ज आहे. हवाई सुरक्षेबरोबरच लष्कराने काही रणगाडे आणि तोफा सीमेजवळ आणल्या आहेत. खबरदारी म्हणून या सर्व हालचाली करण्यात येत आहेत.
पाकिस्तान उपउच्चायुक्तांना समन्स
शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत भारतावर हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न करणार्या पाकिस्तानच्या कारवाईचा भारताने तीव्र शब्दांत निषेध केला आहे, तसेच पाकच्या या कृतीसाठी भारतातील पाकिस्तानच्या उपच्चायुक्तांना समन्स बजावण्यात आले. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानचे उपउच्चायुक्त सैय्यद हैजर शाह यांना समन्स बजावले आहे. त्यानुसार शाह यांनी संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास साऊथ ब्लॉकमध्ये हजेरी लावली.
विमान सेवा बंद
लेह, जम्मू, श्रीनगर आणि पठाणकोट विमानतळ हाय अलर्टवर असून सुरक्षेच्या कारणास्तव प्रवासी विमानांची वाहतूक थांबवण्यात आली आहे. यामुळे अनेक विमानं विमानतळांवर अडकून पडली असल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानच्या विमानाने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचे समोर आले आहे. नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी विमानाने घुसखोरी केल्याचे वृत्त आहे.
एफ 16 विमान पाडले
भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे एफ-16 हे लढाऊ विमान पाडतानाच पाकचा हल्ला उधळवून लावला आहे. या कारवाईत भारताला एक मिग विमान गमवावे लागले आहे. या विमानातील पायलटही बेपत्ता आहे, अशी अधिकृत माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भारताचा सज्जड दम
नवी दिल्ली : भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमानला आमच्या ताब्यात द्यावे, त्यांच्या केसालाही धक्का लागता कामा नये, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे. दहशतवादाविरोधात भारताने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईनंतर पाकिस्तानने भारताच्या लष्करी ठाण्यांना लक्ष्य करत बॉम्बहल्ला करण्याचा प्रयत्न केला; पण सुरक्षा यंत्रणा कमालीच्या दक्ष असल्याने हा हल्ला निष्फळ ठरला, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.
चिठ्ठी वाचताच मोदींनी भाषण संपविले
बुधवारी सकाळी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांची बैठक झाली. यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे उपस्थित होते, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विज्ञान भवन येथे युवा सांसद पुरस्कार प्रदान सोहळ्यात उपस्थित होते. मोदी उपस्थितांना संबोधित करत असताना त्यांना सुरक्षा रक्षकाने एक चिठ्ठी आणून दिली. ही चिठ्ठी वाचताच मोदींनी भाषण आवरते घेतले आणि ते सभागृहातून निघून गेले. मोदी हे एका उच्चस्तरीय बैठकीसाठी रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानच्या कुरापतींसंदर्भात ही बैठक असल्याचे समजते.