अलिबाग : प्रतिनिधी
गणेशोत्सव तोंडावर आल्याने गणेश कार्यशाळांमध्ये सध्या मूर्ती रंगविण्याच्या कामाची लगबग सुरू आहे. गणेश मूर्तिकार बाप्पावर शेवटचा हात फिरविण्यात व्यस्त आहेत.
गणेशोत्सवाला अवघे काही दिवसच उरले आहेत. त्यामुळे गणेशमूर्तीला फायनल टच देण्यात कारागीर व्यस्त आहेत, पण अशा वेळी पुरेसे कुशल कामगार नसल्यामुळे गणेशमूर्ती वेळेवर तयार करण्यासाठी कारखानदारांना मोठी कसरत करावी लागत आहे.
गणेशमूर्तींमध्ये दरवर्षी भक्तांचा ट्रेण्ड बदलत असतो. या वर्षी फेटेवाल्या गणेशमूर्ती भाविकांना आकर्षित करीत आहेत. वस्त्रालंकारांनी सजलेली मूर्ती पसंतीस पडत आहे. शाडूच्या गणेशमूर्ती परवडत नाहीत, असे सांगितले जात असले तरी आजही शाडूच्या गणेशमूर्तींना खूप मागणी आहे.
माती, प्लास्टर ऑफ पॅरिस, रंग यांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे यंदा गणेशमूर्तींच्या किमतीमध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वर्षी निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे ग्रामीण भागातील मूर्तिकारांना मोठा फटका बसला आहे. मूर्ती पाण्यात भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. पावसात भिजल्याने मूर्ती लवकर वाळत नाहीत, ही समस्या मूर्तिकारांना सतावत आहे.