खासदार श्रीरंग बारणे यांचे निर्देश

अलिबाग ः प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजना असून त्यांची अंमलबजावणी करून त्या जिल्ह्यातील सामान्य जनतेपर्यंत पोहोचवा, असे निर्देश खासदार तथा अध्यक्ष जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समिती श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी (दि. 29) येथे दिले. जिल्हा नियोजन भवन सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी खासदार सुनील तटकरे, आ. जयंत पाटील, आ. मनोहर भोईर, जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवऋषी, अलिबाग नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक आदी उपस्थित होते. या वेळी खा. बारणे म्हणाले की, जिल्ह्यातील जनतेसाठी केंद्र शासन अंगीकृत असलेल्या अनेक योजना शासन राबवत असून या योजनांच्या अंमलबजावणीसाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी), दीनदयाळ उपाध्याय, जलमार्ग विकास कार्यक्रम, प्रधानमंत्री फसल विमा योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अशा अनेक योजनांचा लाभ शहरी तसेच ग्रामीण जनतेला देण्यात यावा, अशा सूचना त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यांना दिल्या. जिल्ह्यातील कोणताही पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, तसेच जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या केंद्र शासनाच्या विविध योजनांसंदर्भातील आढावा त्यांनी या वेळी उपस्थित अधिकारीवर्गाकडून घेतला.
बैठकीच्या प्रारंभी दुखवट्याच्या मंजूर ठरावाचे वाचन करून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली, तसेच जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी अभिनंदनाचे ठराव वाचून दाखविले. या वेळी नागरिक या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देतील, अशी आशा आहे. बैठकीला जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, पंचायत समिती सभापती, नगर परिषदेचे नगराध्यक्ष तसेच विविध शासकीय विभागाचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.