Breaking News

अलिबागेत नारळी पौर्णिमा उत्साहात

अलिबाग : प्रतिनिधी

सन् आयलाय गो, आयलाय गो… नारली पूनवचा… मनी आनंदू मावना कोल्यांचे दुनियेचा… या गीताची आठवण करून देणारा नारळी पौर्णिमेचा सण बुधवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा झाला. या सणाचे पारंपरिक स्वरूप काही प्रमाणात बदलले असले तरी उत्साह कायम असल्याचे पाहायला मिळाले. श्रावण महिना सुरू झाला की सुरुवात होते ती नागपंचमी सणाने आणि त्यानंतर एका पाठोपाठ एक सणांची मालिका सुरू होते. नारळी पौर्णिमेचा हा सण आगरी-कोळी समाजासाठी फार महत्त्वाचा समजला जातो.

जून महिन्यापासून किनार्‍यावर नांगरून ठेवलेल्या होड्या नारळी पौर्णिमेनंतर पुन्हा मच्छीमारीसाठी रवाना होतात. वादळी वार्‍यामुळे पावसाळ्यात मासेमारीवर बंदी असते. नारळी पौर्णिमेनंतर खवळलेला समुद्र शांत होतो. या शांत झालेल्या दर्याराजाला नारळ अर्पण करून त्याच्याकडे सुखसमृद्धीचे भरभराटीचे साकडे घातले जाते. त्याला शांत होण्याचे आवाहन करण्यात येते. नारळी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी कोळी वाड्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पारंपरिक वेषात सजलेले कोळी बांधव-भगिनी मिरवणुकीने वाजतगाजत किनार्‍यावर गेल्या. या वेळी त्यांच्यासोबत विशिष्ट आकाराचा आणि सजलेला नारळ पाहायला मिळाला. गेल्या काही वर्षांत व्यापक प्रमाणात निघणार्‍या मिरवणुकांचे स्वरूप बदलल्याचे पाहायला मिळाले. त्यासोबत कोळी बांधवांचा आनंदही ओसंडून वाहत होता.

दरम्यान, बुधवारी अलिबागसह रायगड जिल्ह्यातील अन्य कोळीवाड्यांमध्ये नारळी पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. सायंकाळी किनार्‍यावर कोळी बांधवांनी गर्दी केली होती. दर्याला नारळ अर्पण करून त्याला शांत होण्याचे आवाहन केले.

नारळफोडीच्या स्पर्धा

नारळी पौर्णिमा आणि नारळफोडीच्या स्पर्धा ही जुनी परंपरा आहे. पूर्वी या स्पर्धा कोळीवाड्यांसह अन्य ठिकाणी पाहायला मिळायच्या, मात्र या स्पर्धांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत हळूहळू कमी होत असल्याचे पाहायला मिळाले.

Check Also

आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …

Leave a Reply