Breaking News

जनाब मुख्यमंत्र्यांना हे झेपेल का? -भातखळकर; धर्मांतर रॅकेट प्रकरणाच्या तपासावरून सवाल

मुंबई : प्रतिनिधी

उत्तर प्रदेश एटीएसने काही दिवसांपूर्वी धर्मांतर रॅकेटचा पर्दाफाश केला होता. एटीएसने कारवाई करत दोघांना अटक केली होती. त्यानंतर या रॅकेटचे धागेदोरे राज्यातील बीड जिल्ह्यापर्यंत पोहचले आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांच्या एटीएस पथकाने सोमवारी बीड जिल्ह्यातील मन्नू यादव, अब्दुल इरफान शेख आणि राहुल भोला यांना अटक केली. या अटकेनंतर खळबळ उडाली असून, भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी या प्रकरणाचे महाराष्ट्रात लागेबांधे असणार असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. धर्मांतरांच्या घटना वाढल्याचा दावा करत योगी सरकारने उत्तर प्रदेशात धर्मांतर विरोधी कायदा लागू केला. या कायद्याखाली कारवाया केल्या जात असतानाच उत्तर प्रदेश एटीएसने अवैधपणे धर्मांतर करणार्‍या दोघांना अटक केली. देशभरात केल्या जात असलेल्या धर्मांतर रॅकेटचा हे दोघे भाग असल्याचा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला होता. मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम या दोघांना अटक केली. त्यानंतर एटीएसने सोमवारी आणखी तिघांना अटक केली आहे. या वृत्ता हवाला देत भाजपचे नेते तथा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ट्विट करत भातखळकर यांनी ठाकरे यांना सवालही केला आहे. उत्तर प्रदेशातील धर्मांतराच्या षडयंत्रात सहभागी असल्याच्या आरोपावरून उत्तर प्रदेश पोलिसांनी बीडच्या एका युवकाला अटक केली आहे. त्याचे लागेबांधे निश्चितच महाराष्ट्रात खोलवर पसरलेले असणार. ठाकरे सरकारने ही पाळेमुळे खणून काढावीत. जनाब मुख्यमंत्र्यांना हे झेपेल का?, असे भातखळकर यांनी म्हटले आहे.

मूळ प्रकरण काय? : उत्तर प्रदेश पोलिसांच्या एटीएसने मूळ दिल्लीतील रहिवाशी असणार्‍या मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम यांना अटक केली होती. बेकायदेशीर धर्मांतरप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली होती. मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम हे दोघे दक्षिण दिल्लीतील जामिया नगर भागात राहत होते. मूकबधिर मुले आणि महिलांचे धर्मांतर केल्यांच्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग असून, एक हजारांपेक्षा जास्त लोकांचे त्यांनी धर्मांतर केले असल्याचे पोलिसांनी म्हटले होते. तपासादरम्यान आरोपींना पाकिस्तानमधील आयएसआय, परदेशा संस्थांकडून पैसा पुरवला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे, असा दावाही पोलिसांनी केला होता. या कारवाईनंतर आता बीडमधून तरुणाला अटक करण्यात आली आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply