Breaking News

मानिवलीमध्ये जि. प. शाळा इमारतीला गळती

कर्जत : बातमीदार

कर्जत तालुक्यातील मानिवली येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत नव्याने बांधण्यात आली आहे. 36 लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या इमारतीमध्ये अजूनही विद्यार्थी बसायला गेले नाहीत, मात्र त्या अगोदरच या शाळा इमारतीला गळती लागली आहे. या इमारतीच्या काही वर्गखोल्यांमध्ये पाणी पडत आहे. त्यामुळे नित्कृष्ट दर्जाचे काम करणार्‍या ठेकेदाराची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

कर्जत तालुक्यातील मानिवली गावात 2005-2006 च्या दरम्यान तीन वर्ग खोल्या असलेली षटकोनी शाळा बांधण्यात आली होती. त्या वर्गखोल्या कमी पडत असल्याने पाच वर्ग खोल्या इमारत बांधकामासाठी निधी मंजूर झाला. 2016-17 या शैक्षणिक वर्षात सर्व शिक्षा अभियानांतर्गत सुमारे 36 लाख रुपये मंजूर झाल्यानंतर या इमारत बांधणीचे काम सुरू करण्यात आले होते. सहा वर्ग खोल्यांची ही इमारत पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे या शाळा इमारतीचे उदघाटन झाले नसतानाही तेथे वर्ग भरविण्यास सुरुवात झाली आहे, मात्र पहिल्याच पावसात या इमारतीला गळती लागली आहे. इमारतीच्या स्लॅबमधून पावसाचे पाणी वर्ग खोल्यांमध्ये पडत असून, भिंतीदेखील ओल्या झाल्या आहे.

ही इमारत निकृष्ट दर्जाची झाली असतानाही शाळा व्यवस्थापन समिती, तसेच मुख्याध्यापक किंवा शाळेतील शिक्षकांनी त्याबाबत पं. स. शिक्षण विभाग, तसेच जिल्हा परिषदेला कळवले नाही, याबाबत पालक व ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

मानिवली येथील जिल्हा परिषदेच्या षटकोनी शाळेच्या इमारतीलादेखील गळती लागली असून, त्यावर प्लॅस्टिक टाकले आहे. या शाळेत इयत्ता आठवीपर्यंत 121 विद्यार्थी आहेत, तर यासाठी तीन इमारती आहेत, नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत सहा वर्गखोल्या, षटकोनी इमारतीत 3 वर्गखोल्या, तसेच गावात 2 वर्गखोल्या आशा एकूण 11 वर्गखोल्या तयार झाल्या आहेत.

मानिवली येथील शाळा इमारतीसंदर्भात विचारणा करण्यासाठी कर्जतच्या गटशिक्षणाधिकारी सुरेखा हिरवे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

मानिवली येथील जि. प. शाळेच्या नवीन इमारतीत पाच वर्गखोल्या मंजूर होत्या, मात्र सहा वर्गखोल्या बांधण्यात आल्या आहेत. शाळेचा स्लॅब लिकेज झाला आहे. या संदर्भात कोणाकडेही तक्रारी

केल्या नाहीत. शाळा व्यवस्थापन समितीला कळविले आहे. त्यांनी शाळेच्यावर सभागृह बांधायचे ठरविले आहे. त्यासाठी 10 लाख रुपये मंजूर झाले आहेत.

-पी. टी. राठोड, मुख्याध्यापक,

जिल्हा परिषद शाळा, मानिवली

मानिवली जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीसंदर्भात आमच्याकडे कोणत्याही प्रकारे तक्रारी आलेल्या नाहीत.

-बाळाजी पुरी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, कर्जत

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply