नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त
लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई व रायगड जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. 14 सप्टेंबर ते रविवार दि. 15 सप्टेंबर या कालावधीत नवी मुंबई स्पोर्ट्स व सामाजिक विकास मंडळ, सिडको समाज मंदिर, दुसरा मजला, सेक्टर 18, नवीन पनवेल येथे महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते व रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे संस्थापक व अध्यक्ष संजय कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (दि. 14) सकाळी 10 वाजता लायन्स क्लब ऑफ पनवेलच्या अध्यक्षा शोभा अशोक गिल्डा, सेकेटरी ज्योती नागेश देशमाने, खजिनदार व प्रोजेक्ट चेअरमन राजेंद्र जेसवानी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वेळी संजय मोरेश्वर पोतदार यांच्यातर्फे त्यांच्या आई व वडिलांच्या स्मरणार्थ महिला व पुरुष गटातील विजेत्या खेळाडूंना फिरता आकर्षक भव्य चषक देऊन विजयी खेळाडूंचा गौरव करणार आहेत. या स्पर्धेस संजय पोतदार, नागेश देशमाने, अशोक गिल्डा, मीना संजय पोतदार, भावना राजेंद्र जेसवानी, मदन गोवारी, गौतम म्हस्के, मधुकर भगत, नंदकिशोर घोत्रे, संजय गोडसे, के. एस. पाटील, तसेच लिओ व लायन सभासद उपस्थित असतील. या स्पर्धेत पनवेल व पेण येथील नामवंत डॉक्टर्स सहभागी होणार आहेत. त्यामुळे डॉक्टर्स ग्रुप अशी फक्त डॉक्टरांसाठी वेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, ही स्पर्धा रविवारी (दि. 15) सकाळी 10.30 वाजता सुरू करण्यात येईल. ही स्पर्धा पुढील विविध गटांत घेण्यात येणार आहे. बीगनर्स मुले व मुली, 10 वर्षाखालील मुले व मुली, 12 वर्षाखालील मुले व मुली, 14 वर्षाखालील मुले व मुली, 17 वर्षाखालील मुले व मुली, युथ मुले व मुली, 39 वर्षावरील पुरुष एकेरी, 12 वर्षाखालील मुले व मुली दुहेरी, 14 वर्षाखालील मुले व मुली दुहेरी, पुरुष दुहेरी, महिला व पुरुष एकेरी, डॉक्टर्स ग्रुप एकेरी अशा विविध गटांत ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेचे मुख्य पंच पराग अंकोलेकर व राजेश कुरबेट हे असतील.