पनवेल ः रामप्रहर वृत्त
अतिवृष्टीत डुंगी गावातील नागरिकांना वाचविणार्या पनवेल कोळीवाड्यातील मच्छीमार बांधवांचा पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वतीने सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र गिड्डे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या हस्ते शनिवारी (दि. 7) सन्मान करण्यात आला. दि. 4 सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्याप्रमाणे डुंगी गावात जवळपास पाच फुटावर पाणी साचले होते. या गावात अडकलेल्या ग्रामस्थांना बाहेर काढण्यासाठी कोळीवाड्यातील मच्छीमार बांधव स्वतःच्या बोटी घेऊन पाण्यात उतरले व त्यांनी जवळपास सव्वाशे लोकांना पाण्यातून बाहेर सुरक्षित काढले. यावेळी सिडकोने बोटीची व्यवस्था केली होती, मात्र ग्रामस्थांची संख्या पाहता बचावकार्याला अंधार झाला असता व त्यामुळे परिस्थिती बिकटझाली असती. आपत्कालीन व्यवस्थेत नेहमीच धावून येणार्या कोळीवाड्यातील बांधवांनी या ठिकाणी धाव घेऊन ग्रामस्थांना मोठा दिलासा दिला. त्यांच्या कार्याचे कौतुक पनवेल पोलिसांच्या वतीने करून त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी मच्छीमार बांधव व कोळीवाडा पंच कमिटीचे अध्यक्ष किरण भोईर, ज्येष्ठ सल्लागार हरिचंद्र उर्फ हारु भगत, प्रमोद कोळी, कृष्णा शेलार, अनंता शेलार, कृष्णा भगत, भरत भगत आदी उपस्थित मच्छिमार बांधवांचा सत्कार करण्यात आला.
कोळीवाडा येथील मच्छीमार बांधव आपत्कालीन परिस्थितीत नेहमी मदतीला धावून येतात. उमरोली येथील नदीत वाहून गेलेल्या दाम्पत्यांचा मृतदेह शोधून देण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. तसेच दरवर्षी गणेश मूर्ती विसर्जनाच्यावेळी विसर्जन व्यवस्थितपणे करण्यात त्यांचे चांगले योगदान लाभते. खर्या अर्थाने ते या अनुषंगाने समाजसेवा करीत आहेत.
-विजय तायडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक