चांद्रयान-2च्या संपूर्ण अभियानादरम्यान देश अनेकदा आनंदित झाला. आताही आपले ऑर्बिटर मोठ्या दिमाखात चंद्राची परिक्रमा करीत आहे. भारत जगातील महत्त्वाच्या अवकाश शक्तींपैकी एक आहे. विज्ञानात केलेले सर्व प्रयोग आपल्या अमर्याद धाडसाची आठवण देतात. चांद्रयान-2च्या अंतिम चरणाचा निकाल आमल्या अपेक्षेनुसार आला नाही, पण चांद्रयानाचा संपूर्ण प्रवास अतिशय उत्तम होता, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. विक्रम लँडरचा संपर्क तुटल्यानंतर ते इस्त्रोच्या सेंटरमधून देशाला संबोधित करीत होते.
या वेळी मोदी म्हणाले की, ज्ञानाचा सर्वात मोठा शिक्षक जर कुणी असेल तर तो आहे विज्ञान. विज्ञानात अपयश नसतेच, असतो तो केवळ प्रयोग आणि प्रयत्न असतो. कधीही हार न मानणार्या आपल्या संस्कृतीचे इस्रोने जतन केले आहे. मी कालही म्हटले होते आणि आजही म्हणतो की, मी तुमच्यासोबत आहे. देश देखील आपल्यासोबत आहे. तुम्हा सर्वांना पुढील सर्व मोहिमांसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही दह्यावर रेषा खेचणारे लोक नसून दगडावर रेषा काढणारे लोक आहात असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांचा गौरव केला. मी आणि संपूर्ण देश इस्त्रो व शास्त्रज्ञांच्या बाजूने आहे. निराश होऊ नका. भारतीय शास्त्रज्ञांनी देशासाठी अमूल्य योगदान दिले आहे. चांद्रयान-2साठी आपल्या टीमने प्रचंड परिश्रम घेतले आहेत. या मोहिमेशी संबंधित सर्वजण धेय्याने झपाटलेले होते. आता चंद्रावर जाण्याचे आपले स्वप्न अधिक प्रबळ झाल्याचे पंतप्रधान म्हणाले.