Breaking News

पुढच्या वर्षी लवकर या!

धो धो पावसातही खोपोली-खालापुरात विसर्जन

खोपोली ः प्रतिनिधी

भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पाची व पवित्र गौराईची यथासांग भक्ती करून शनिवारी (दि. 7) खालापूर-खोपोलीत बहुसंख्य सार्वजनिक व हजारो घरगुती गौरी गणपती बाप्पांचे कोसळणार्‍या धो-धो पावसात अत्यंत भावपूर्ण वातावरणात विसर्जन करून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, असे सांगत बाप्पाला निरोप देण्यात आला.

खोपोली व खालापुरातील  हजारो घरगुती गौरी-गणपती व 19 सार्वजनिक गणपती बाप्पांचे विसर्जन ढोल-ताशांच्या खणखणाटात, संगीताच्या तालावर

वाजतगाजत व प्रचंड जल्लोषात कडक पोलीस बंदोबस्तात मिरवणुकीने झाले. खोपोली नगरपालिकेकडून प्रथेप्रमाणे यावर्षीही गणपती विसर्जन मिरवणुकांचे भव्य स्वागत येथील दीपक चौकात करण्यात आले. 

खोपोलीतील हायको कॉर्नरमार्गे निघालेल्या विसर्जन मिरवणुका बाजारपेठेमधून शंकर मंदिर तळ्यापर्यंत एकापाठोपाठ एक जात होत्या. विसर्जन मिरवणुकांत गैरप्रकार होऊ नये व कायदा -सुव्यवस्था राहावी यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. संपूर्ण स्थितीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर लक्ष ठेवून होते.

कर्जत तालुक्यात 5965 गणरायांना निरोप

कर्जत ः प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील कर्जत, नेरळ व माथेरान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण 5965 गणरायांना व 2608 गौरींना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.  यंदा गणेशोत्सवात पावसाने विश्रांती घेतल्याने गणेशोत्सवाची मजा घेता आली. गणपती व गौरींचे विसर्जन पुढच्या वर्षी लवकर या, अशा गजरात करण्यात आले.

कर्जत तालुक्यातील कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत खासगी 3830 व सार्वजनिक 14 गणरायांचे, नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत खासगी 2083, तर माथेरान पोलीस ठाण्याच्या हद्दीत खासगी आणि सार्वजनिक एक असे एकूण खाजगी 5965 व 15 अशा एकूण 5980 गणरायांचे आणि तालुक्यातील एकूण 2608 गौरींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करून निरोप देण्यात आला. शनिवारी युवक मित्र मंडळ आणि कर्जत रेल्वे स्टेशनच्या गणरायाला निरोप देण्यात आला.

नेरळचे माजी सरपंच आयुब तांबोळी, जब्बार सय्यद आदी मुस्लिम बांधवांनी मशिदीसमोरून जाणार्‍या गणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी केली व नागरिकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

पेणमध्ये भरपावसातही गणेशभक्तांचा उत्साह कायम

????????????????????????????????????

पेण ः प्रतिनिधी

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मोठ्या भक्तिभावाने गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करून बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर शनिवारी ’गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या,’ असे  म्हणत पाच दिवसांच्या गणपतींचे गणेशभक्तांनी गौरींसह विसर्जन करून आपल्या लाडक्या गणरायाला भरपावसात निरोप दिला. पेण तालुक्यातील एकूण आठ सार्वजनिक व घरगुती गणपतींचे मोठ्या जल्लोषात वाजतगाजत सवाद्य मिरवणुकांनी गौरींसह उत्साहात विसर्जन करण्यात आले. पेण शहरातील देवआळी गणेशोत्सव मंडळ, हनुमानआळी गणेशोत्सव मंडळ, प्रभूआळी गणेशोत्सव मंडळ या तीन सार्वजनिक गणपतींचे व ग्रामीण भागातील वडखळ येथील एक व शेणे आदिवासी वाडीतील एक अशा तालुक्यातील एकूण पाच सार्वजनिक गणपतींचे व घरगुती गणपतींचे गौरींसह विसर्जन करण्यात आले. पेण शहरातील गणेशमूर्तींचे येथील कासार तलावात तसेच भोगावती नदीच्या विसर्जन घाटावर, तर ग्रामीण भागातील गणपतींचे त्या त्या गावातील नदीपात्रात व तलावांत विसर्जन करण्यात आले. विसर्जनासाठी निघालेल्या मिरवणुकांनी रस्ते फुलून गेले होते. नंदीमाळ नाका व कासार तलाव येथे पेण पालिकेतर्फे स्वागत कक्ष उभारण्यात येऊन विसर्जनासाठी निघालेल्या गणेशभक्तांचे स्वागत करण्यात येत होते. तसेच शिवाजी चौकातदेखील शांतता कमिटीच्या सदस्यांकडून व पोलीस प्रशासनाकडून गणेशभक्तांचे स्वागत करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक इंद्रजित काटकर यांनी शहरात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply