Breaking News

अतिरिक्त कर आकारणीला खोपोलीत विरोध

खोपोली : प्रतिनिधी 

येथील नगर परिषदेने चालू वर्षीच्या मालमत्ता कर मागणी पावतीमध्ये कचरा संकलन या नावाने 480 रुपये अतिरिक्त कर आकारणी केली आहे. हा अतिरिक्त कर कशासाठी याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, या अतिरिक्त कराला खोपोली शहरातून विरोध वाढत आहे.

खोपोली नगर परिषदेकडून मालमत्ता करामध्ये यापूर्वीच वृक्षकर, शिक्षण कर, स्वच्छता कर, अग्निशमन कर, वाढीव पाणीपुरवठा कर अशा करांची आकारणी करण्यात आली आहे. तरीही  यावर्षीच्या मालमत्ता कर मागणी बिलात ’कचरा संकलन’  या  नवीन कराची वाढ करण्यात आली आहे. कचरा संकलन कर म्हणून नगर परिषदेकडून प्रत्येक मालमत्ता धारकाला 480 रुपये एवढ्या मोठ्या रकमेची कर आकारणी करण्यात आली आहे. ही नवीन कर मागणी बिले शहरात वितरित होत असून, यात अतिरिक्त कराची आकारणी बघून नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. मनमानी करून लावण्यात आलेला हा अतिरिक्त कर भरण्यास नागरिकांचा तीव्र विरोध होत आहे.

वास्तविक स्वच्छता अभियान अंतर्गत कचरा संकलन, निर्मूलन आणि कचरा व्यवस्थापन यासाठी नगर परिषदांना भरीव निधी प्राप्त आहे. तरीही अशा प्रकारे अतिरिक्त कर लावून अगोदरच बेजार झालेल्या नागरिकांची एकप्रकारे लूट करण्याचा हा प्रकार असल्याचा संताप खोपोलीत उमटत आहे. याबाबत प्रतिक्रियेसाठी मुख्याधिकारी गणेश शेटे यांना संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क झालेला नाही, मात्र आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी याबाबत माहिती देताना सदर कराबाबतचा विषय नगर परिषदेच्या वार्षिक बजेटसाठीच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला होता. शहरातील कचर्‍याचे प्रभावीपणे संकलन होण्यासाठी तसेच याकरिता अपेक्षित अतिरिक्त खर्चामधील काही भार मालमत्ताधारकांवर टाकण्याचा प्रस्ताव  प्रशासनाकडून ठेवण्यात आला होता. त्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply