Breaking News

पनवेल मनपातील भाजप नगरसेवकांचा कोरोनाविरोधात लढा

दोन महिन्यांचे मानधन महापौर सहाय्यता निधीत

पनवेल : प्रतिनिधी
कोरोनाशी दोन हात करण्यासाठी पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी आपले दोन महिन्यांचे मानधन महापौर सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला असून तसे पत्र सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या उपस्थितीत आयुक्त गणेश देशमुख यांना दिले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर केल्यावर शासनस्तरावर आर्थिक मंदीची परिस्थिती येऊ लागली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात 17 कोरोना रुग्ण आढळल्याने या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका युद्धपातळीवर उपाययोजना राबवित आहे. त्याचा परिणाम महापालिकेच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात होत असल्याने आर्थिक पाठबळाची गरज आहे. त्यामुळे महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेला आर्थिक मदत करण्याचे आवाहन नगरसेवक, उद्योजक आणि दानशूर नागरिकांना केले आहे.
या आवाहनाला प्रतिसाद देऊन अनेक जण आर्थिक मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. पनवेल महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व 54 नगरसेवकांनी आपले दोन महिन्यांचे मानधन महापौर सहाय्यता निधीला देत असल्याचे जाहीर करून तसे पत्र सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे सुपूर्द केले. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील उपस्थित होते.
दरम्यान, पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 9) नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. तालुक्यातून आतापर्यंत  288 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 21 नमुने पॉझिटिव्ह, 254 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह, तर 13 जणांचे रिपोर्ट अद्याप मिळालेले नसल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. महापालिका हद्दीत घरी अलगीकरण केलेले 175 जण आहेत. पनवेलच्या कोविड रुग्णालयात 27 आणि कामोठे एमजीएम रुग्णालयात चार जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे. दुसरीकडे 692 जणांनी अलगीकरण कालावधी पूर्ण केला आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply