अलिबाग ः प्रतिनिधी
नाममात्र हजेरी लावून गायब झालेल्या पावसाने रविवारी (दि. 19) रायगड जिल्ह्यात हजेरी लावली. दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी पडत होत्या, मात्र त्यात हवा तसा जोर नव्हता. त्यामुळे मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. सर्वसाधारणपणे जून महिन्यात 7 तारखेपासून मोसमी पाऊस पडण्यास सुरुवात होते. यंदा पाऊस लवकर पडणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यामुळे सर्वजण आनंदी होते, मात्र हवामान खात्याचा अंदाज चुकला. त्यानंतर काही ठिकाणी तो पडला, पण सर्वदूर पोहचला नाही. जूनचा तिसरा आठवडा संपायला आला तरी पाऊस पडत नसल्याने शेतकर्यांसह सारेच चिंतातुर झाले होते. अखेर रविवारी सकाळपासून पाऊस पडण्यास सुरुवात झाली, मात्र या पावसाला जोर नव्हता. थांबून थांबून हलक्या जलधारा बरसत होत्या. मान्सून लांबल्याने अनेक ठिकाणी जलसाठा संपून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वेळेत पाऊस पडला असता तर ही वेळ आली नसती, पण पाऊस पडत नसल्याने परिस्थिती बिकट होत चालली आहे. मान्सून सक्रिय होईपर्यंत पाण्याची चणचण भासण्याची शक्यता आहे. पावसाअभावी शेतीकामेही खोळंबली आहेत. अनेक शेतकर्यांनी अद्याप पेरणी केलेली नाही. शेतीकामे करण्यासाठी चांगला पाऊस पडणे आवश्यक आहे, मात्र पाऊस दडी मारून बसल्याने शिवारातील कामांचा खोळंबा होत असून बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.