नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
सिडको महामंडळातर्फे महामंडळाच्या मालकीच्या भूखंड, दुकाने व कार्यालये यांच्या विक्रीकरिता नव्याने सुरू करण्यात आलेल्या ई-लिलाव प्रक्रियेबद्दल इच्छुक अर्जदारांना मार्गदर्शन करण्यासाठी गुरुवारी (दि. 19) सातवा मजला, सिडको सभागृह, सिडको भवन, सीबीडी-बेलापूर, नवी मुंबई येथे विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
ई-लिलाव प्रक्रियेंतर्गत योजना पुस्तिका ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येऊन त्यासाठीचे अर्ज व अनामत रक्कम शुल्क लिलाव प्रक्रिया राबविणार्या बँकेतर्फे ऑनलाईन स्वीकारण्यात येणार आहे, तसेच अयशस्वी अर्जदारांनी भरलेली अनामत रक्कम बँक खात्यात विशिष्ट कालावधीनंतर आपोआप जमा होणे या सुविधाही याद्वारे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे इच्छुक अर्जदारांना, संपूर्ण प्रक्रिये दरम्यान कोणत्याही टप्प्यावर सिडको कार्यालयामध्ये प्रत्यक्ष येण्याची गरज भासणार नाही, तसेच ई-लिलाव प्रक्रिया ही सुरक्षित, पारदर्शक व जलद असण्याबरोबरच त्यामध्ये अचूकताही येणार आहे.
सदर ई-लिलाव प्रक्रिया ही अर्जदारांच्या दृष्टीने नवीन असल्याने ई-लिलाव पोर्टलच्या वापराबाबत अर्जदारांना मार्गदर्शन करण्याकरिता गुरुवारी सातवा मजला, सिडको सभागृह, सिडको भवन, सीबीडी-बेलापूर, नवी मुंबई येथे मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ई-लिलाव पोर्टलविषयक अर्जदारांच्या शंकांचे निरसनही या सत्रादरम्यान करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक अर्जदारांनी 19 सप्टेंबर रोजी या सत्रास उपस्थित राहण्याचे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.