Breaking News

युवीचे मार्गदर्शन कामी आले : रोहित

मुंबई : प्रतिनिधी

रोहित शर्माची बॅट वर्ल्ड कप स्पर्धेत सध्या चांगलीच तळपत आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक पाच शतकांचा विक्रम त्याच्या नावावर आहे आणि वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. शिवाय वर्ल्ड कप स्पर्धेतील त्याचे हे एकूण सहावे शतक ठरले आहे आणि त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांमध्ये रोहितने 647 धावांसह अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. रोहितच्या या यशामागे सिक्सर किंग युवराज सिंगचा महत्त्वाचा वाटा आहे. हे खुद्द रोहितनेच सांगितले.

रोहित म्हणाला, आयपीएल स्पर्धेत माझ्या धावांचा ओघ आटला होता. त्या वेळी युवराजने मला मार्गदर्शन केले. तो माझ्यासाठी मोठ्या भावासारखा आहे. त्यामुळे त्याच्यासोबत मी नेहमीच खेळ आणि आयुष्य याची चर्चा करीत असतो. तेव्हा त्याने मला सांगितले, जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा तू धावांचा पाऊस पाडशील. त्याला वर्ल्ड कप स्पर्धेबद्दलच सुचवायचे होते. त्याच्या या वाक्याने माझा आत्मविश्वास उंचावला.

2011च्या वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीही युवराज अशाच परिस्थितीतून गेला होता, त्यामुळे त्याचे मार्गदर्शन कामी आल्याचे रोहितने सांगितले. ’आयपीएलदरम्यान आम्ही खेळांविषयी चर्चा करायचो. 2011च्या वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी त्याच्याही बॅटमधून धावांचा ओघ आटला होता, पण वर्ल्ड कपमध्ये त्याने दमदार कामगिरी केली. त्याने जे काही सांगितले, त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली,’ असे रोहित म्हणाला.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply