पनवेल : रामप्रहर वृत्त
पंडित नेहरूंकडून हिंदू कोड बिल मंजूर झाले नाही म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजीनामा दिला. हिंदू कोड बिल हिंदूंतील एकतेसाठी आणि न्यायासाठी आहे. यामुळे देशातील 80 टक्के हिंदूंना न्याय, एकता, अखंडता, बंधुत्व निर्माण होणार असल्याने हिंदू कोड बिल लागू करणे ही काळाची गरज असल्याचे मत प्रा. अतुल जैन यांनी खारघर येथे व्यक्त केले. मंगळवारी (दि. 17) सत्याग्रह महाविद्यालयात हैद्राबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या औचित्यावर आयोजित ‘देशाच्या अखंडता व एकतेसाठी काय?’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी कोकणातील पाणी मराठवाड्यात घेऊन जाण्याचा केलेला संकल्प अभिनंदनीय आहे. तो पूर्णत्वाला नेण्याची गरज असल्याचे सांगितले. या वेळी प्रा. ललिता कोंडलवाडे, प्रा. संगीता जोगदंड, प्रा. स्वाती राऊत, प्रा. मंगेश कांबळे यांनी हैद्राबाद संस्थानातील तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या मराठवाड्यातून मुंबईत रोजगार, स्वंयरोजगार, उद्योग, व्यवसाय, शिक्षण, सामाजिक अन्याय, शेतकरी आणि शेतमजूर आत्महत्याग्रस्त व जातीय अत्याचाराचे बळी असलेल्या कुटुंबातून स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या दैनंदिन व समाज जीवनातल्या समस्यांची मांडणी या चर्चासत्रात बोलताना केली.