पनवेल : वार्ताहर
सार्या भारतीयांच्या मनात अतिव आदराचे स्थान प्राप्त केलेल्या भारतरत्न लतादीदी येत्या 28 सप्टेंबर रोजी वयाची 90 वर्षे पूर्ण करीत आहेत. लतादीदींच्या 90व्या वाढदिवसानिमित्त त्यांना मानवंदना म्हणून रसिकांच्या कायम स्मरणात राहील असा ‘लता-90’-अ सॅल्यूट टू दि लिव्हींग लीजंड हा सर्वांगसुंदर कार्यक्रम दि डिव्हाइन म्युझिक अनलिमिटेडतर्फे पनवेलमध्ये आयोजित केला जात आहे. ‘डिव्हाइन म्युझिक’चा ‘लता-90’ हा आगामी कार्यक्रम लतादीदींच्या वाढदिवशीच म्हणजे शनिवारी (दि. 28) पनवेलच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रात्री 8.30 ते 11.30 या वेळेत सादर केला जाईल. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यात लतादीदींना कीर्तीशिखरावर पोहोचविण्यास आधारभूत झालेल्या 25 मान्यवर संगीतकारांचे प्रत्येकी एक गाणे याप्रमाणे लतादीदींची उत्कृष्ट 25 सोलो हिंदी गाणी सादर केली जातील. ही एकसे एक बढकर गाणी सुप्रसिद्ध पार्श्वगायिका संजीवनी भेलांडे, संगीताच्या अभ्यासक डॉ. मृदुला दाढे-जोशी अशा संगीत क्षेत्रातील आजच्या आघाडीच्या, लोकप्रिय गायिकांबरोबरच अस्मिता काळे, आकांक्षा भोईर आणि सारेगम लिटल चॅम्प वंडरगर्ल मिथिला माळी सादर करतील. प्राजक्ता जोगळेकर या कार्यक्रमाचे निवेदन करतील. जयंत टिळक यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेला हा कार्यक्रम जुन्या हिंदी गाण्यांच्या चाहत्यांसाठी एक अनमोल पर्वणीच असेल. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका शनिवार (दि. 21) पासून इम्प्रेशन्स, अक्षय सोसायटी, सिटी पोस्टाजवळ पनवेल येथे आणि बुधवार (दि. 25) पासून नाट्यगृहात उपलब्ध होतील. अधिक माहितीसाठी जयंत 9930742475, चंद्रकांत 8082015305, डॉ. मनोज 9167212012 यांच्याशी संपर्क साधावा.