पनवेल ः वार्ताहर
सानपाडा, नवी मुंबई येथे एका इमारतीमध्ये अनधिकृत इंटरनॅशनल कॉल सेंटर चालत असल्याबाबत मध्यवर्ती कक्ष, गन्हे शाखेस गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्त, पोलीस सहआयुक्त, पोलीस उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, गुन्हे शाखा, सहा. पोलीस आयुक्त अजय कदम गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखा, नवी मुंबईच्या सपोनि राणी काळे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत एलोरा फिस्टा टॉवर, 8वा मजला, ऑफिस नं. 803, जुईनगर रेल्वे स्टेशनजवळ, सेक्टर 11, सानपाडा येथे रात्रीच्या वेळी अनधिकृत इंटरनॅशनल कॉल सेंटर चालू असल्याबाबत माहिती मिळाल्याने त्यानुसार मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी या ठिकाणी छापा मारला. येथे मन्सूर अली कासीम शेख हा त्याच्या साथीदारांसह कॉन्सीअर्ज हेल्प केअर सोल्युशन सर्व्हिसेस या नावाने रात्रीच्या वेळेस कॉलसेंटर चालवित होते. त्या ठिकाणी सदर इसम टेक प्रोसेस या प्रकाराद्वारे इंटरनेटद्वारे कॉल करून अमेरिकन नागरिकांना त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये गंभीर प्रकारचा व्हायरस असल्याचे भासवून तो व्हायरस तुमच्या लॅपटॉप, कॉम्प्युटरमधील डेटा करप्ट करील, अशी भीती दाखवून त्यांच्या कॉम्प्युटरचा रिमोट अॅक्सेस स्वतःकडे घेऊन त्यांची मदत केल्याचे भासवून त्यांच्याकडून पैसे वसूल करून त्यांची आर्थिक फसवणूक करीत होते. अमेरिकन नागरिकांना त्यांच्यावर अमली पदार्थाची तस्करी, मनी लाँड्रिग या संदर्भातील गुन्हे दाखल असून जर त्यांनी फेडरल ऑफिसरला सहकार्य केले नाही, तर त्यांना अटक होईल, अशी भीती दाखवून अमेरिकन नागरिकांकडून पैसे वसूल करण्याबाबतची स्क्रिप्ट मिळून आली आहे. यासंदर्भाने सानपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.