महाडमधील विरेश्वर तलावाच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध झाल्याने या तलावाच्या सुशोभीकरणामुळे महाडच्या सौंदर्यात अधिकच भर पडणार आहे.
स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला महाडपासून काही अंतरावर असल्याने या शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्यावर पाण्यासाठी सत्याग्रह केला. त्यामुळे या शहराचे महत्त्व अधिकच वाढले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, चवदार तळे, विरेश्वर तलाव, क्रांतिस्तंभ, रायगड किल्ला असे सारे काही ऐतिहासिक घटक महाडसाठी महत्त्वाचे आहेत. महाड शहर पुणे आणि मुंबई या दोन्ही मोठ्या शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी असून महामार्गालगत आहे. त्यामुळे सातत्याने येथे येणार्या पर्यटकांची गर्दी वाढत आहे. विरेश्वर तलावाच्या सुशोभीकरणासाठी आता शासनाने निधी दिला आहे. त्यामुळे लवकरच हे काम पूर्ण होईल. तलावाच्या सुशोभीकरणामुळे शहराच्या सौंदर्यात अधिक भर पडेल यात शंका नाही.
गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या महाड विरेश्वर तलाव सुशोभीकरण प्रस्तावाला युती सरकारने हिरवा कंदील दिला असून आ. प्रवीण दरेकर यांनी केलेला सततचा पाठपुरावा आणि प्रयत्नांतून पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी तत्काळ बैठक घेऊन तलावाच्या
संवर्धनासाठी दोन कोटी 50 लाख 67 हजार 600 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे महाडकरांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
महाडचे ग्रामदैवत विरेश्वर महाराज यांच्या मंदिर परिसराचे सुशोभीकरण आणि तलावाचे संवर्धन व्हावे ही महाडकरांची आणि देवस्थानची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. तत्कालीन आघाडी सरकारने या प्रस्तावाला महत्त्व न दिल्याने महाडकरांच्या भावना कुठेतरी दुखावल्या गेल्या होत्या. सदर प्रकरणी देवस्थानचे सरपंच दिलीपशेठ पार्टे यांनी महाडचे भूमिपुत्र आमदार प्रवीण दरेकरांना या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली होती. दरम्यान, आ. प्रवीण दरेकर यांनी विरेश्वर मंदिर परिसर आणि पडझड झालेल्या तलावाची पाहणी करून देवस्थानला पुन्हा नव्याने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. यासाठी भाजप उपजिल्हाध्यक्ष राजेय भोसले यांना जबाबदारी देण्यात आली, तसेच आ. दरेकर यांनी सदर फेरप्रस्ताव तयार करण्यासाठी पुणे येथील निलेश पवार या कन्सल्टंटची नेमणूक केली. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या दालनात त्यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण प्रधान सचिव, आ. प्रवीण दरेकर, देवस्थान कमिटी, संबंधित अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत आ. दरेकर यांनी विरेश्वर तलावाच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी करून पाठपुरावा केला.
आ. प्रवीण दरेकरांच्या प्रयत्नांना यश आले असून 17 सप्टेंबर रोजी मंत्रालयात सुकाणू समितीच्या बैठकीत महाड विरेश्वर मंदिर तलावाच्या संवर्धनासाठी दोन कोटी 50 लाख 67 हजार 600 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये 70 टक्के राज्य शासन आणि 30 टक्के अंमलबजावणी संस्था यांचा सहभाग असणार आहे. यामध्ये तलावाचे बांधकाम, पाणी शुद्धिकरण, गाळ काढणे, सौंदर्यीकरण, हरितपट्टा, कुंपन, बालोद्यान, नौकाविहार, स्वच्छतागृह या कामांचा समावेश आहे.
विरेश्वर महाराज हे प्रसिध्द मंदिर आहे. महाडवासीयांचे ते ग्रामदैवत आहे. येथील तलावाचे संवर्धन होणे ही काळाची गरज होती. देवस्थान नागरिकांची अनेक वर्षांपासूनची तशी मागणी होती. आता ही मागणी पूर्ण झाल्याने सर्वांमध्ये समाधानाची भावना आहे.
-महेश शिंदे