पनवेल ः वार्ताहर
सिटिझन्स युनिटी फोरम, पनवेल व सेंट झेवियर महाविद्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व पनवेल महानगरपालिकेच्या सहकार्याने स्वच्छता मोहिमेंतर्गत रविवारी (दि. 22) पनवेल रेल्वेस्टेशन नजीकच्या परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या परिसरामध्ये लोकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे कचरा मोठ्या प्रमाणात होत असतो. यामध्ये जवळपास 50 ते 60 विद्यार्थी व संस्थेच्या लोकांनी सहभाग घेतला. सुका व ओला कचर्याचे वर्गीकरण नागरिकांनी स्वतः घरातूनच करावे व नागरिकांनी त्याची सुरुवात स्वतःपासूनच करावी, असे कफने सांगितले. महानगरपालिकेनेही झाडू, घमेली व साफसफाईसाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून दिले. नागरिकांनी स्वच्छतेसाठी महापालिकेला सहकार्य करावे, असे महानगरपालिका स्वच्छता विभागाचे शैलेश गायकवाड व अरुण कांबळे यांनी सांगितले. सेंट झेवियरचे डॉ. भगवती उपाध्याय यांनी कफ या संस्थेसोबत काम करायला मिळाले म्हणून कफचे अध्यक्ष श्री. लिमये व श्री. भिसे यांचे आभार मानले.