Breaking News

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार

स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान; राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन

पनवेल : रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने विशेष प्राविण्यासह अव्वल स्थान मिळवत राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 पटकाविला आहे. हा बहुमान मिळवणारे रायगड, नवी मुंबईतील हे एकमेव विद्यालय ठरले आहे. याबद्दल या विद्यालयाचा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 15 ऑगस्ट रोजी होणार्‍या जिल्हास्तरीय कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे.
केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने आयोजित स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी राज्यातील बहुतांश शाळांनी सहभाग घेतला होता. त्याचे मूल्यमापन करून जिल्ह्यांनी राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रतिजिल्हा 14 शाळांचे नामांकन केले. त्यानुसार शाळांची राज्यस्तरीय मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झाली. यात ग्रामीण प्राथमिक व माध्यमिक आणि शहरी प्राथमिक, माध्यमिक तसेच उपश्रेणी असे विभाग होते. त्या अनुषंगाने राज्याच्या शिक्षण मंत्रालयाकडून स्वच्छ विद्यालयांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये शहरी भागातील माध्यमिक शाळांमध्ये रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने फाइव्ह स्टार रेटिंगसह प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
शिक्षणासह, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणार्‍या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
यंदा आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. त्याचे औचित्य साधून स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी होणार्‍या जिल्हास्तरीय कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला स्वच्छ विद्यालय पुरस्कार हे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन सन्मान करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे राज्यातून एकूण 26 शाळांना राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. त्यातही रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा समावेश झाला आहे. या बहुमानाबद्दल स्कूलच्या प्राचार्य राज अलोनी, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply