पनवेल ः रामप्रहर वृत्त
एका वर्षांत दोन लाख घरे बांधण्याचा निर्णय जाहीर करणार्या सिडकोने नवी मुंबई, पनवेल, उरण तालुक्यातील संपादित मोकळ्या जमिनीवर जास्तीत जास्त गृहप्रकल्प व औद्योगिक वसाहती उभारणार असल्याचे सांगितले आहे. सिडकोने गेल्या 50 वर्षांत या संपादित जमिनी संरक्षित न केल्याने त्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहिलेली आहेत. त्यामुळे मोकळ्या असलेल्या सर्व संपादित जमिनींचे सर्वेक्षण करून हे भूखंड येत्या काळात संरक्षित करण्यात येणार आहेत.
सिडकोने मोठमोठे गृहप्रकल्प राबविण्याचा धूमधडाका सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी 95 हजार घरांच्या विक्रीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे अगोदरची 15 हजार घरे आणि आता जाहीर केलेली 95 हजार घरे अशा एक लाख 10 हजार घरांची बांधकाम निविदा प्रक्रिया पूर्ण होत असतानाच सिडकोने आणखी एक लाख 10 हजार घरांची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे सिडकोने ही योजना ग्रामीण भागाजवळ जाहीर केली आहे. तीनशे एकर जमीन सिडकोकडे परत आलेली आहे. त्यामुळे आता विकसकांना भूखंड विकून निधी उभारण्याऐवजी गृहप्रकल्प राबवून सिडकोची तिजोरी भरण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयडीसीच्या औद्योगिक पट्ट्यात दररोज कामानिमित्ताने येणार्या हजारो कामगारांसाठी सिडको यानंतर पावणे, बोनसरी, शिरवणे, कुकशेत या ग्रामीण व औद्योगिक भागाजवळ असलेल्या सिडकोच्या जमिनींवर गृहप्रकल्प राबविणार आहे.
सिडकोने आता जास्तीत जास्त गृहप्रकल्प राबविण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. उद्योगधंद्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.
-लोकेश चंद्र, संचालक