Breaking News

पीएमसी बँकेवर निर्बंध; रायगडात जिल्ह्यातही ग्राहकांची धावाधाव

खोपोली, खालापूर,

कळंबोली : प्रतिनिधी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. यामुळे खातेदार केवळ एक हजार रुपये इतकीच रक्कम काढू शकतात. अचानक झालेल्या या कारवाईमुळे खातेदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, पैसे काढून घेण्यासाठी ग्राहकांनी बँकेच्या शाखांकडे धाव घेतली. या घटनेचे रायगड जिल्ह्यातही परिणाम दिसून आले.

पेण अर्बन बँकेत कोट्यवधी रुपयांना फसलेल्या रायगडकरांना मंगळवारी

(दि. 24) दुसरा धक्का बसला. पीएमसी बँकेच्या व्यवहारांवर रिजर्व्ह बँकेने निर्बंध आणल्याचा मेसेज ठेवीदारांच्या मोबाईलवर आला आणि एकच धांदल उडाली. जो तो बँकेची शाखा गाठू लागला. खोपोली शाखेतही ठेवीदारांनी मोठी गर्दी केली होती. या ठेवीदारांना आपल्या खात्यातून एक हजार रुपयेच काढता येणार आहेत, हे ऐकून आणखी धक्का बसला. कामोठे, कळंबोली व अन्य ठिकाणीही हीच परिस्थिती पहावयास मिळाली. या घटनेने 10 वर्षांपूर्वी दिवाळखोरीत निघालेल्या व अद्यापही ठेवी न मिळालेल्या पेण को-ऑपरेटीव्ह बँकेची आठवण पुन्हा ताजी झाली आहे.

पीएमसी बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन या बँकेवर रिर्झव्ह बँकेने निर्बंध जारी केले आहेत. बँकिंग नियमन कायदा 35 अ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. पीएमसी बँकेवर नवीन कर्ज देणे, ठेवी स्वीकारण्यासह अनेक आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले आहे, तसेच या काळात बँकेच्या ठेवीदारांना आपल्या सर्व प्रकारच्या खात्यामधून केवळ एक हजार रुपयेच काढता येतील. हे निर्बंध सहा महिन्यासांठी लागू आहेत व त्याचा पुन्हा आढावा घेतला जाईल. या निर्बंधांची माहिती बँकेने प्रत्येक ठेवीदाराला देणे बंधनकारक आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आली.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply