पनवेल : प्रतिनिधी
सामाजिक कार्य हेच खरे राजकारण, निवडणुकीपुरते भांडा, नंतर विकास साधा, असे लोकसभा सभापती सुमित्राताई महाजन यांनी नुकतेच धुळे येथे शिक्षण महर्षी स्व. बापूसाहेब विसपुते यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण प्रसंगी बोलताना सांगितले. आदर्श शैक्षणिक समूहाचे शिक्षण महर्षी स्व. बापूसाहेब विसपुते यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण रविवार 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता लोकसभा सभापती सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते आदर्श शैक्षणिक संकुलाच्या आदर्श पोलिटेक्निक महाविद्यालय धुळे येथे होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, महापौर चंदूबापू सोनार, अनुपजी अग्रवाल, राजेश मिश्रा, धनराज विसपुते आणि सहकार व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या वेळी त्यांनी आदर्श समूहाच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करून धनराज विसपुते यांच्या कार्याचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याचे सांगून मनमाड-इंदौर रेल्वे मार्गामुळे विकासाचे द्वार उघडणार असून मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राला जोडणारा हा मार्ग सातपुडा पर्वत रांगांमध्ये राहणार्या आदिवासींपर्यंत विकास पोहोचवण्यासाठी आणि बेरोजगारी दूर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या वेळी सुमित्राताईंना आदर्श समूहाच्या वतीने सन्मानपत्र देण्यात आले. या वेळी शिक्षण महर्षी स्व. बापूसाहेब विसपुते स्मरणिकेचे त्यांचा हस्ते प्रकाशन करण्यात आले.