पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल रेल्वेस्टेशनचे प्रबंधक एस. एम. नायर यांच्या पुढाकाराने पनवेल स्टेशनवर रिक्षावाल्यांसाठी स्वतंत्र मार्गिका सुरू करण्यात आली असून लवकरच तेथून प्री-पेड रिक्षा सुरू होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या रिक्षावाल्यांबाबतच्या तक्रारी कमी होतील आणि त्यांची फसवणूक होणार नाही. याबद्दल प्रवासी संघटनेने त्यांचे आभार मानले.
पनवेल रेल्वेस्टेशनवरून प्रवाशांकडून रिक्षावाले जास्त भाडे घेत असल्याच्या अनेक तक्रारी येत असतात. काही रिक्षावाले स्टेशनमध्ये जाऊन नवीन प्रवाशाला हेरून आपल्या रिक्षेत घेऊन येतात. नंतर त्यांच्याकडून प्रवाशांना लुटण्याच्या घटनाही घडल्या आहेत. स्टेशनवर रिक्षावाले कोणतीही शिस्त पाळत नाहीत. त्यामुळे पनवेल रेल्वे स्टेशन सल्लागार समितीने अनेक वेळा याबाबत कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन प्रबंधक एस. एम. नायर यांनी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अभिजीत मोहिते आणि पनवेलच्या परिवहन अधिकारी हेमांगी पाटील यांच्याबरोबर रेल्वेस्टेशनला बैठक घेऊन यावर मार्ग काढण्यासाठी प्री-पेड रिक्षा सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यांनी तो मंजूर केला. स्टेशन प्रबंधकांनी रेल्वेकडून रिक्षा बुकिंगसाठी काऊंटर उभारण्यासाठी जागाही मंजूर करून घेतली आहे. पनवेल रेल्वेस्टेशनवर प्री-पेड रिक्षा बुकिंगसाठी नोंदणी असलेल्या संघटनेने परिवहन खात्याकडे अर्ज केल्यावर त्याला मंजुरी दिली जाणार आहे. त्यानंतर त्यांनी तेथे स्वतः काऊंटर बांधून घ्यावयाचा आहे. यासाठी पनवेल स्टेशनवरील रिक्षा संघटनेने ही तयारी दाखवली आहे. स्टेशनचे प्रबंधक एस. एम. नायर यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी प्री-पेड रिक्षा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.