Breaking News

खोपोलीत प्लास्टिक विरोधी जनजागृती रॅली

खोपोली : प्रतिनिधी

बंदी घातली असतानाही खोपोली शहरात प्लास्टिक पिशव्याचा सर्रास वापर होत आहे. प्लास्टिक पिशव्या वापराचा एक गुन्हाही खोपोलीमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे खोपोली नगरपालिकेच्या वतीने गुरुवारी (दि. 26) सकाळी शहरात प्लास्टिक विरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत सहभागी झालेल्या केएमसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बाजारपेठेतील सर्व दुकानांत जाऊन, प्लास्टिक पिशव्या वापरू नका, असे आवाहन दुकानदारांना केले. प्लास्टिक वापरासंबधी रायगड जिल्ह्यातील पहिला गुन्हा खोपोली शहरात घडल्याने असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून नगरपालिकेकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. गुरुवारी नगरपालिकेच्या वतीने काढण्यात आलेल्या प्लास्टिक विरोधी जनजागृती रॅलीत नगराध्यक्षा सुमनताई औसरमल, उपनगराध्यक्षा विनिता कांबळे, आरोग्य सभापती प्रमिला सुर्वे, शिक्षण सभापती केविना गायकवाड, नगरसेवक मोहन औसरमल यांच्यासह नगरपालिका कर्मचारी, पत्रकार व विद्यार्थी सहभागी झाले होते. प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा व नगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन या वेळी नगराध्यक्षा सुमनताई औसरमल यांनी केले.

Check Also

अखिल भारतीय टेबल टेनिस स्पर्धेत स्वस्तिका घोष विजेती

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त अखिल भारतीय आंतर संस्थात्मक टेबल टेनिस …

Leave a Reply