चेन्नई : वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची मुलगी रूपा गुरुनाथ यांची तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन (टीएनसीए)च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. रूपा यांना टीएनसीएच्या 87व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. बीसीसीआयच्या कोणत्याही राज्य संघटनेमध्ये महिला अध्यक्ष बनणार्या त्या पहिल्या महिला आहेत, पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांची अध्यक्ष बनण्याची औपचारिक घोषणा करण्यात आली नाही.
टीएनसीएच्या निवडणुकीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. निवडणूक घेत असताना सर्वोच्च न्यायालयाने एक अट घातली होती. त्यामुळे निवडणूक झाली तरी निकाल न्यायालयाच्या आदेशानंतरच घोषित करण्यात यावेत, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते.
एकीकडे रूपा गुरुनाथ यांची अध्यक्षपदी निवड झाली असतानाच बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने टीएनसीएच्या नव्या संविधानाला लोढा समितीच्या शिफारसींनुसार चुकीचे सांगितले आहे. टीएनसीएने 4 ऑक्टोबरपर्यंत संविधानावर पुन्हा काम करावे, ज्यामुळे त्यांना 23 ऑक्टोबरच्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होता येईल, असे प्रशासकीय समितीकडून सांगण्यात येत आहे, पण याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयच घेईल, असे टीएनसीएचे वकील म्हणत आहेत.