चेन्नई : वृत्तसंस्था
वन डे आणि टी-20 सामन्यांमध्ये मी क्रमांक चारवर फलंदाजी करू शकतो, असे सध्या भारतीय संघाबाहेर असलेल्या सुरेश रैनाने म्हटले आहे. रैना गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत शेवटचा सामना खेळला होता. सध्या तो टी-20 विश्वचषकापूर्वी संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे. सन 2020 आणि 2021मध्ये दोन टी-20 विश्वकप स्पर्धा होणार आहेत.
रैनाचे हे मत ’द हिंदू’ वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले आहे. यापूर्वी चौथ्या स्थानावर फलंदाजी केली असून, चांगली कामगिरी करून दाखवल्याचे रैनाने म्हटले आहे. टी-20च्या दोन विश्वचषक स्पर्धा होणार असताना आपण संधीच्या शोधात असल्याचेही रैनाने म्हटले आहे.
भारतीय संघातील क्रमांक चार हे स्थान दीर्घकाळापासून चर्चेचा विषय राहिला आहे. अंबाती रायडूला चौथ्या स्थानी खेळवल्यानंतर निवडकर्त्यांनी विश्वचषक स्पर्धेसाठी विजय शंकरची निवड केली. शंकर जायबंदी झाल्यानंतर ऋषभ पंतला या स्थानी खेळण्याची संधी देण्यात येत आहे, मात्र त्याची कामगिरी फारशी चांगली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
धोनी आताही संघासाठी बरेच काही करू शकतो असे रैनाला वाटते. धोनी एक उत्कृष्ट यष्टीरक्षक आहे. शिवाय खेळाचा सर्वांत मोठा फिनिशरही आहे. तो आजही फिट आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत धोनी भारतासाठी महत्त्वाचा सिद्ध होईल, असे मत रैनाने व्यक्त केले आहे.