अलिबाग : प्रतिनिधी
जागतिक हृदयदिनाचे औचित्य साधून इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) रविवारी (दि. 29) अलिबागकर नागरिकांकरिता 45 मिनिटे चालण्याची वॉकेथॉन व्यायाम रॅली आयोजित केली होती. तिला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे जागतिक हृदयदिनी ‘आयएमए’ने जणू अलिबागकरांचे हृदयच जिंकल्याचे चित्र शहरातील रस्त्यावर पाहायला मिळत होते. रविवारी सकाळी 7 वाजता क्रीडाभुवन येथून जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी हिरवा झेंडा दाखवत वॉकेथॉन व्यायाम रॅलीचा प्रारंभ केला. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, लायन्स क्लबचे अध्यक्ष रमेश धनावडे यांसह वरिष्ठ डॉक्टर, वकील, पत्रकार, विविध स्वयंसेवी संस्था व अलिबागकर नागरिक उपस्थित होते. असोसिएशन अलिबाग शाखेचे अध्यक्ष बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र चांदोरकर व सचिव ज्येष्ठ भूलतज्ज्ञ डॉ. संजीव शेटकार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अलिबागमधील डॉक्टरांनी जनतेच्या स्वास्थ्यासाठी राबविलेला हा स्तुत्य उपक्रम आहे. हृदयाचे रोग होऊ नये म्हणून डॉक्टर चालण्याचा संदेश देताहेत ही खूप चांगली गोष्ट आहे. या उपक्रमातून आजपासून सातत्य दाखवून चालण्याची चांगली सवय लागेल. आपण चाललो तर हृदय चालेल, असे मत पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी या वेळी व्यक्त केले. हृदय नेहमी आपल्याला सांंगतच असते की तुम्ही रोज माझ्याासाठी एक तास चाला. मी तुमच्यासाठी आयुष्यभर चालेन, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी सांगितले. असोसिएशन अलिबाग शाखेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र चांदोरकर यांनी प्रस्ताविकात चालण्याचे फायदे सांगितले. डॉ. संजीव शेटकार, लायन्स क्लबचे अध्यक्ष रमेश धनावडे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. राजश्री चांदोरकर व डॉ. प्रीती प्रधान यांनी केले. डॉ. सतीश विश्वेकर यांनी आभार मानले. वॉकेथॉन व्यायाम रॅलीत डॉ. एस. एन. तिवारी, डॉ. चंद्रकांत वाजे, डॉ. पांडुरंग शिंदे, डॉ. राजीव धामणकर, डॉ. विनायक पाटील, मुरूड येथील डॉ. राज कल्याणी, डॉ. पटेल यांसह अलिबागमधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.