शेतकरी व आदिवासी बांधवांत जनजागृती
कडाव : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यामधील सह्याद्रीच्या दर्याखोर्यांमध्ये विषारी, बिनविषारी सापांच्या अनेक प्रजाती आढळतात, मात्र सापांविषयी अपुरी माहिती असल्याने सर्व सापांना विषारी साप म्हणून मारले जाते. त्यामुळे सापांच्या काही जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्पमित्र ऋषिकेश शिंदे (कर्जत) यांनी सायकलवरून रायगड जिल्ह्यात 600 किलोमीटर प्रवास करून सापांविषयी जनजागृती केली. कर्जत तालुक्यातील कडाव येथील सर्पमित्र ऋषिकेश शिंदे यांनी विविध जातीतील अनेक सापांना जीवदान दिले आहे.सापांविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी, असे त्यांना सातत्याने वाटत होते. म्हणूनच त्यांनी 26 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत सायकलवरून प्रवास करून जिल्ह्यातील शेतकरी, आदिवासी बांधव आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यामध्ये सापांविषयी जनजागृती करून सापांचे संवर्धन करा आणि साप वाचवा, असा सल्ला दिला. त्यासाठी त्यांनी सायकलवरून दररोज 100 किलोमीटर प्रवास केला. त्यांच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.