पेण : प्रतिनिधी
बचतगटांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन महिलांनी उन्नती साधावी, असे प्रतिपादन रायगड जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रकाश देवरुषी यांनी अंतोरे (पेण) येथे केले.
राज्यात 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत अंगणवाडी पोषण पूरक आहार महाअभियान राबविण्यात आले. त्याचा सांगता समारंभ अंतोरे येथे आयोजित करण्यात आला होता. त्यात प्रकाश देवरुषी मार्गदर्शन करीत होते. शासनाने राबविलेल्या अनेक उपक्रमांमुळे महिलांच्या रोजगाराला चालना मिळाली असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
या अभियानादरम्यान महिला बचतगटांनी पोषण आहार, पाककला तसेच रांगोळी प्रदर्शन भरविले होते. त्यातील विजयी महिलांना या वेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. पेण पंचायत समिती तालुका व्यवस्थापक शीतल माळी, शिक्षण विस्तार अधिकारी अविनाश घरत, एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या रुजुता केणी, आरोग्य विभागाच्या मंथना पाटील, प्रभाग समन्वयक नेहा पाटील, प्रीती पाटील, शीतल म्हात्रे आदींसह महिला या समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.