स्वच्छ भारत अभियानाचे सर्वात मोठे योगदान हे आहे की याचा सर्वाधिक लाभ गोरगरीबांना व महिलांना मिळतो आहे. शौचालयांच्या अभावी गावोगावी महिलांची अवस्था अतिशय वाईट होती. खेड्यापाड्यातील शाळांमध्ये शौचालयाची सोय नसल्याने कित्येकदा मुलींना शाळेत जाणे थांबवावे लागत होते. महिला व मुलींना या दुर्दैवी स्थितीतून बाहेर काढण्याचे मोलाचे काम मोदी सरकारने केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 मध्ये सुरू झालेले ‘स्वच्छ भारत अभियान’ हे जागतिक स्तरावर एक आदर्शवत विकासात्मक मोहीम म्हणून नावाजले जात असून अनेक देशांकडून या मोहिमेचा अत्यंत प्रेरणादायी म्हणून गौरव केला जातो आहे. महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीच्या निमित्ताने देशातील जनता उघड्यावर शौच करण्याच्या सवयीपासून मुक्त झालेला देश त्या महात्म्याच्या चरणी अर्पण करण्यासाठी झटत असून जनसामान्यांच्या या एकवटलेल्या ध्यासाची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरेपूर घेतली जाते आहे. जगभरात आपल्या सेवाभावी कामांमार्फत मोठा लौकिक कमावलेल्या ‘बिल अँड मिलिंडा गेट्स फाऊंडेशन’ने भारत सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकताच ‘ग्लोबल गोलकीपर पुरस्कार’ जाहीर केला. मोदीजींनी या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करताना, देशातील 130 कोटी लोकांची शक्ती कुठलाही संकल्प पूर्ण करण्यासाठी एकवटली तर आव्हान कितीही मोठे असो त्यावर मात करणे शक्य आहे, असे उद्गार काढले आहेत. स्वच्छ भारत अभियानाला एका जनआंदोलनाचे रूप देणार्या देशातील लोकांना त्यांनी हा पुरस्कार अर्पण केला आहे. लोकांनी स्वच्छतेला आपल्या दैनंदिन जीवनात अग्रक्रमाचे स्थान दिल्यामुळेच हे अभियान यशाची वाट चोखाळते आहे. ज्या मोहिमेत जनतेने इतक्या मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला असेल अशी एकही मोहीम आज जगाच्या कोपर्यात कुठेही नजरेस पडत नाही. स्वच्छ भारत अभियानाची सुरूवात भले सरकारी पातळीवर झाली परंतु मोदीजींच्या जादुई नेतृत्वामुळे जनतेने उत्स्फूर्तपणे या मोहिमेत सहभाग घेत अल्पकाळातच मोहिमेचे नेतृत्व स्वत:कडे घेतले. याचा सर्वात मोठा परिणाम हा होता की अवघ्या पाच वर्षांच्या काळात देशभरात 11 कोटीहून अधिक शौचालये उभारली गेली. स्वच्छता आणि आरोग्याचा फार गहिरा संबंध आहे. अनेक रोगांचा फैलाव हा निव्वळ अस्वच्छतेतून होत असतो. त्यामुळेच भारताने राबवलेल्या स्वच्छ भारत अभियानाची नोंद जागतिक आरोग्य संघटनेनेही घेतली आहे. अवघ्या पाच वर्षांच्या काळात स्वच्छ भारत अभियानाचा प्रभाव इतका कमालीचा आहे की त्यामुळे किमान 3 लाख लोकांचे जीवन बचावले आहे असे म्हणता येऊ शकेल असे प्रतिपादन थेट जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आले आहे. स्वच्छ भारत अभियानामुळे मुलांमधील हृदयसंबंधी विकारांचे प्रमाण खाली येण्यास मदत झाली आहे तसेच महिलांमधील बॉडी मास इंडेक्स अर्थात बीएमआय सुधारण्यास मदत झाली आहे. बिल अँड मिलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या अहवालात याचा उल्लेख करण्यात आला आहे. गांधीजींनी देशातील स्वच्छतेला फार महत्त्व दिले होते. एखादे गाव जेव्हा स्वच्छ असते तेव्हाच ते आदर्श बनू शकते असे गांधीजी म्हणत. स्वच्छ भारत अभियानाने अवघा देशच जगासमोर आदर्श म्हणून उभा करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे.